” राष्ट्रीय डेंग्यू दिवस ” १६ मे

” डेंग्यू ” हा अतिशय गंभीर आजार आहे. दरवर्षी १६ मे हा दिवस ” राष्ट्रीय डेंग्यू दिवस ” म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना डेंग्यू आजार बद्दल माहिती व जनजागरण करणे हा आहे. या वर्षीचे घोष वाक्य ” Connect with Community, Control Dengue ” आहे. त्याचे मराठी भाषांतर ” समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा ” असे आहे.

डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा ” एडिस इजिप्टाय ” नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी ८ दिवसापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रुपांतर डासात होते. कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त साठवून ठेवू नये. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची उत्पत्ती कमी करुन नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला जनतेचे सहकार्य आवश्यक आहे.

 

सध्या उन्हाळा सुरु असल्याने जिल्ह्यात पाण्याचा तुटवडा असल्याने नागरिकांकडून पाणी साठविण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. त्या अनुषंगाने साठविलेल्या पाण्यात एडिस इजिप्टाय डास अंडी घालतात. त्यातून डासोत्पत्ती होते.

 

” डेंग्यू ” हा अत्यंत गंभीर आजारांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो लोक या आजाराने ग्रस्त आहेत. तर काही लोकांसाठी हा आजार जीवघेणाही ठरतो. विशेषतः पावसाच्या सुरुवातीच्या काळात डेंग्यूचे रुग्ण सर्वाधिक आढळतात. अशा परिस्थितीत लोकांनी डेंग्यू या आजारा बाबत जागरुकता बाळगली पाहिजे. दरवर्षी १६ मे हा दिवस ” राष्ट्रीय डेंग्यू दिवस ” म्हणून साजरा केला जातो. यामागचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे.

” राष्ट्रीय डेंग्यू दिवस ” १६ मे हा का साजरा केला जातो, याच कारण आणि इतिहास याबद्दल थोडीशी माहिती.

• राष्ट्रीय डेंग्यू दिवसाचा इतिहास •

दरवर्षी १६ मे हा ” राष्ट्रीय डेंग्यू दिवस ” म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना या आजाराबद्दल जागरुक करणे आणि त्याची लक्षणे, कारणे आणि उपचारांबद्दल माहिती देणे. हा दिवस आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया तर्फे साजरा केला जातो. या आजाराबाबत लोकांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त जागरुकता असली तरी तरी ही ते या आजाराला लोक बळी पडतात. डेंग्यू या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्याबाबत अचूक माहिती व्हावी यासाठी शासन स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

 

• डेंग्यू आजाराची कारणे •

डेंग्यू हा डासांपासून पसरणारा रोग आहे. साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या वाढतात. डेंग्यूचा डास चावल्याने डेंग्यू होतो. जुलै ते ऑक्टोबर हे महिने डेंग्यूच्या अळ्यांच्या प्रजननासाठी अनुकूल असतात. या काळात पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता अधिक असते. अशा साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या वाढू शकतात. डेंग्यूमध्ये अनेक प्रकारची सुरुवातीची लक्षणे दिसू शकतात.

 

• डेंग्यू आजाराची लक्षणे •

“एडीस एजिप्टाय” डासाच्या संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच-सहा दिवसानंतर डेंग्युची लागण होते. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ) अशा दोन प्रकारे हा आजार फैलावतो. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो. लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी , अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. याखेरीज एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, चव आणि भूक नष्ट होणे, मळमळणे आणि उलट्या होतात. डेंगी ताप आजारात रुग्णास २ ते ७ दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दु:खीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होतो. अशक्यतपणा, भुक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करुन घेणे आवश्यक आहे.

 

 

• डेंग्यू आजार टाळण्यासाठी उपाय •

ताप असेपर्यंत आराम करा. ताप कमी होण्यासाठी ‘पेरासिटेमोल’ गोळ्या घ्या. ताप अथवा वेदनाशामक म्हणून अस्पिरीन अथवा आयबुप्रोफेन गोळ्या घेऊ नयेत.निर्जलिकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजिवनी) रक्तस्त्राव किंवा शोकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे. अंग पूर्णपणे झाकणारे कपडे घालावेत मच्छरदाणी किंवा क्रीमचा वापर करावा.साठवलेले किंवा साचलेले पाणी बदलावे तसेच तुंबलेल्या गटारी वाहती करावीत तसेच खाली न करता येणार्‍या पाणी साठ्यात, उदा. टाकी हौद यामध्ये गप्पी मासे सोडावेत.आपल्या घरी डेंग्यू ताप सर्वेक्षणसाठी येणार्‍या आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करा व आपण अथवा इतर कोणीही आजारी असल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केद्रात संपर्क साधावा.डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन दिली आहे.झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावीत. पांघरन घेवून झोपावे. सायंकाळी ६ ते ८ यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवून रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवडयाला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.

भविष्यात डेंगीताप या आजाराचा उद्रेक होवू नाही. यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपायांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी. आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आठवडयातून एकदा रिकामे करावीत व कोरडा दिवस पाळावा. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडा करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. आंगणात व परिसरातील खड्डे बुजवावेत, त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावीत.

डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन दिली आहे.किंवा बाहेर डासांची पैदास होऊ देऊ नका.घरामध्ये घाण पाणी साचू देऊ नका.भांड्यात पाणी किंवा छतावर इतर कोणतीही वस्तू असल्यास लगेच फेकून द्या.

• या गोष्टी लक्षात ठेवा •

डेंग्यूचा डास हा सामान्य डासांपेक्षा वेगळा असतो आणि तो दिवसा चावतो.

घरामध्ये आणि आजूबाजूला डासांची पैदास होऊ देऊ नका.

उन्हाळ्यामुळे जवळपास सर्वच घरांमध्ये कुलरचा वापर केला जातो.

कुलरमध्ये पाणी साचल्याने त्यात डेंग्यूच्या अळ्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. अशा स्थितीत कूलर वापरल्यानंतर लगेचच त्यातील पाणी रिकामे करा.

पावसाळ्यात कुंड्या, बाटल्या किंवा इतर ठिकाणी पाणी साचू देऊ नका.

नागरिकांनी वरील प्रमाणे दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती थांबविण्यास मोठी मदत होईल व डास चावणार नाहीत. योग्य काळजी, वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे.

– संकलन –

– सत्यजीत टिप्रेसवार,

आरोग्य पर्यवेक्षक, (हिवताप) मुदखेड तालुका,आरोग्य निरीक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर जि. नांदेड.

मोबाइल-९४२३०३०९९६

satyajit996@gmail.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!