नांदेड – जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी व बालविवाहाला आळा घालण्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या वेळोवेळीच्या सूचनेनुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. दिनांक 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होणार नाही यासाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क असतांनाच जिल्ह्यात दिनांक 10 मे रोजी बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षास प्राप्त झाली. प्राप्त माहितीची शहानिशा केली असता दोन्ही विवाहातील मुली अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. हे बालविवाह थांबविण्याकरिता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही बालविवाह रोखण्यात यश प्राप्त झाले.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे यांनी तात्काळ संबंधित कुटुंबाची माहिती घेतली. यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्पाचे विजय बोराटे तसेच लोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, संबंधित ग्रामसेवक तसेच चाईल्ड हेल्प लाईनचे ऐश्वर्या शेवाळे, दिपाली हिंगोले, निलेश कुलकर्णी यांनी कुटुंबाचे समुपदेशन करून सदरील बालविवाह थांबविला. दोन्ही बालविवाह थांबविण्यात प्रशासनास यश प्राप्त झाल्याबद्दल संपूर्ण यंत्रणेचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कौतुक केले.