नांदेड(प्रतिनिधी)-1 कोटी 63 लाख 93 हजार 454 रुपयांची लोकांची फसवणूक करून अद्याप फरार असलेल्या आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे पारितोषीक देण्यात येईल अशी शोध पत्रिका नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.एस.आरसेवार यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या शोध पत्रिकेत करण्यात आली आहे.
दि.29 ऑगस्ट 2023 रोजी अनिल गुणाजी पाईकराव रा.वैशालीनगर नांदेड यांच्या तक्रारीनुसार छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, धार संचलित महाराष्ट्र अन्नदाता सेवा केंद्र आणि जनकल्याण बांधकाम कल्याण कामगार संघटना या संस्था महाराष्ट्र शासनाच्यावतीने चालविण्यात येत असून त्यात गोरगरीब लोकांना माफक दरात अन्नदान मिळेल, ईलेक्ट्रीक स्कुटी, शिलाई मशीन, लॅपटॉप, सायकल, विधवा पेन्शन अशा विविध प्रकारच्या योजना असल्याचा प्रचार त्यांच्या जनसंपर्क विभागाच्यावतीने करून केलेल्या कपटीपणासाठी 26 लाख 87 हजार 500 रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 406,409, 420, 120(ब)506, भारतीय हत्यार कायदा 3/25 आणि एमपीआयडी कायदा 1999 च्या कलम 3 आणि 4 प्रमाणे बाबासाहेब शंकर तुतारे रा.धार ता.औंढा नागनाथ जि.हिंगोली, माया देविदास खिल्लारे रा.तरोडा बु नांदेड, पद्मावती पांडूरंग जमशलवार रा. तरोडा नांदेड, रमेश गुलाब चव्हाण रा.नांदेड, सोनाली बाजड रा.नांदेड आणि दिपक बुक्तरे रा.वाडी (बु) नांदेड अशा सहा लोकांविरुध्द गुन्हा क्रमांक 376/2023 दाखल करण्यात आला. हा आर्थिक फसवणूकीचा विषय होता म्हणून या गुन्ह्याचा तपास नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग झाला. त्यानंतर लोकांनी दिलेल्या अर्जांमुळे ठेवीदारांच्या फसवणूकीचा आकडा 1 कोटी 63 लाख 93 हजार 454 रुपयांपर्यंत पोहचला आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलातील आर्थिक गुन्हा शाखेने जनतेला आवाहन केले आहे की, छायाचित्रातील हा व्यक्ती गुन्हा घडला तेंव्हापासून फरार आहे. त्याला पकडण्यासाठी जनतेने मदत करावी. मदत करणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस दिले जाईल आणि माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे शोध पत्रिकेत नमुद केले आहे.