ईव्हीएम मशीन का बदलल्या याचा जाब विचारण्यासाठी वंचितचे सोमवारी धरणे आंदोलन

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा मतदारसंघात दिनांक 26 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले मात्र ऐन मतदानाच्या दिवशीच कोणतेही कारण नसताना शेकडो ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ईव्हीएम मशीन बदलताना किंवा बदलल्यानंतरही संबंधित कोणत्या उमेदवाराला माहिती देण्यात आली नाही . त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ईव्हीएम मशीन का बदलल्या याचा जाब विचारण्यासाठी दिनांक 13 मे रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
देशात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात झाली मात्र ऐन मतदानाच्या दिवशीच सकाळी दीडशेच्या वर ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्या तर सायंकाळी पाच वाजता सत्तरहून अधिक ई व्ही एम मशीन बदलण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या ईव्हीएम मशीन बदलत असताना संबंधित कोणत्याही उमेदवाराला जिल्हा प्रशासनाच्या वतीने अथवा निवडणूक विभागाच्या वतीने कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. ही माहिती मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी संबंधितांना कळविण्यात आली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार केवळ पाच ते सहा ठिकाणीच ईव्हीएम बाबत तक्रारी आल्या होत्या . उर्वरित कोणत्याही ठिकाणी ईव्हीएम बाबत तक्रारी आल्या नाहीत . असे असताना 250 ठिकाणी ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्या ही माहिती आता जिल्हा निवडणूक विभागानेच जारी केली आहे . त्यामुळे सुरुवातीला बोटावर मोजण्या इतक्या ईव्हीएम मशीन बाबत तक्रार आल्याची माहिती प्रसिध्द करणाऱ्या जिल्हा प्रशासनाने 250 मशीन बदलल्याचे लेखी निवेदन काढले आहे. त्यामुळे ही संपूर्ण मतदान प्रक्रिया संभ्रमावस्था निर्माण करणारी असल्याने ईव्हीएम मशीन बदलाण्या मागे नेमका काय हेतू होता ? त्यांचा बोलविता धनी किंवा मशीन बदल करणारा मेंदू कोणाचा होता हे जिल्हा निवडणूक विभागाने त्वरित जाहीर करावे आणि निर्माण झालेली संभ्रम दूर करावा या मागणीसाठी दिनांक 13 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनास नांदेड लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार एडवोकेट अविनाश भोसीकर , जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तींबिरे , शिवा नरंगले , शहराध्यक्ष विठ्ठल गायकवाड ,आयुब खान, शाम कांबळे , प्रा. राजू सोनसळे , केशव कांबळे, कमलेश चौधरी सुनील सोनसळे, विजय भंडारे , महेंद्र धनेकर, दैवशाला पांचाळ, निरंजनाताई आवटे सौ चाफलकर,सौ कोकरेताई, कौशल्याताई रणवीर आधी सह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *