हा चोरटा खूनात सुध्दा सहभागी आहे
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरटयाला पकडून त्याने चोरलेल्या 48 ग्रॅम सोन्याचे दागिणे आणि 200 ग्रॅम चांदीचे दागिणे, रोख रक्कम 21 हजार रुपये असा एकूण 3 लाख 73 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या चोरट्याने सन 2016 मध्ये विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खून पण केला होता. त्याप्रकरणात त्याला अद्याप अटक झालेली नाही.
पोलीस जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेने संतोष उर्फ चॉकलेट्या बापूराव भोसले(45) रा.कुरळा हा.मु.वहाद ता.कंधार जि.नांदेड यास ताब्यात घेतले. त्याने मुखेड पोलीस ठाण्याअंतर्गत तीन चोऱ्या केल्या आहेत, देगलूर आणि कंधार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत प्रत्येकी 1 अशा चोऱ्या केल्या आहेत. या पाच चोऱ्यात चोरीला गेलेल्या ऐवजापैकी 48 ग्रॅम सोन्याचे दागिणे, 200 ग्रॅम चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम 21 हजार रुपये असा एकूण 3 लाख 73 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेने हस्तगत केलेला आहे. या चोरट्याला पुढील तपासासाठी पोलीस ठाणे मुखेड यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांनी या कामगिरीसाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, संजीव जिंकलवाड, देविदास चव्हाण, रणधिरसिंह राजबन्सी, मोतीराम पवार, ज्वालासिंग बावरी, गजानन बैनवाड, बालाजी यादगिरवाड, शेख कलीम, हनुमानसिंह ठाकूर आदींचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेल्या संतोष उर्फ चॉकलेट्या बापूराव भोसले याने सन 2016 मध्ये विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक ट्रक चालकाचा खून करून त्याच्याकडील पैसे लुटले होते. ट्रक चालकाचा खून करणे हा एकच प्रकार घडला नव्हता तर असे अनेक प्रकार सन 2016 मध्ये घडले होते. त्या प्रकरणामध्ये एका महिलेसह इतर दोन जणांना पोलीसांनी पकडले आणि त्यांच्याविरुध्द न्यायालयात खून आणि दरोडा या सदरांमध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहेत. तो खटला सुरू आहे. संतोष भोसले सुध्दा ट्रक चालकांच्या खून प्रकरणात सहभागी होता अशी नोंद फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 299 प्रमाणे त्या दोषरोपपत्रात नमुद आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष भोसलेला अटकपण झालेली होती. पण खून प्रकरणात त्याचे हस्तांतरण झालेले नव्हते.