नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी एका पोलीस अंमलदाराला निलंबित केल्याचे आदेश पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केले आहेत. मौजे नांदला दिग्रस ता.अर्धापूर येथील कार्यक्रमात फिक्स पॉईंट ड्युटी लावली असतांना तो पोलीस अंमलदार गैरहजर राहिला होता.
दि.28 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मौजे. नांदला दिग्रस ता.अर्धापूर येथे पोलीस अंमलदार विक्रांत दिगंबरराव देशमुख बकल नंबर 631 यांची तेथे फिक्स पॉईंट ड्युटी लावण्यात आली होती. पण ते तेथे हजरच राहिले नाहीत. सायंकाळी बुध्द विहारात सुरू असलेल्या एका कार्यक्रमाचे ध्वनीक्षेपक बंद करण्यासाठी विक्रांत देशमुखने फोन करून नांदला गावच्या पोलीस पाटलांना सांगितले. पोलीसाच्या सुचनेनुसार रात्री 8 वाजता नांदला गावच्या पोलीस पाटलांनी ते ध्वनीक्षेपक बंद केले आणि वादाला येथूनच सुरुवात झाली. त्यावेळी विक्रांत देशमुख हे नांदला गावात तर हजर नव्हतेच. दोन गटांमधील हा वाद रस्त्यावर आला. घटनेची माहिती मिळताच अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम आणि इतर पोलीस अंमलदार नांदला गावात पोहचले. ही माहिती नियंत्रण कक्षाला माहित झाल्यानंतर नांदेड ग्रामीणचे पोलीस उपअधिक्षक जॉन बेनियन, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराय धरणे आणि शेवटी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे नांदला गावात पोहचले आणि गावात होणारी दगडफेक थांबवली.
घडलेल्या घटनेबद्दल त्या ठिकाणी ड्युटी लावलेला पोलीस अंमलदार विक्रात देशमुख यांना काही माहिती नव्हती. पण ते आले उशीरा तो पर्यंत पोलीस अधिक्षकांसह मोठा पोलीस फौजफाटा तेथे हजर होता. त्यानंतर त्या गावातील लोकांनी दिलेल्या तक्रारीनुसार अट्रॉसिटी कायद्यासह गुन्हा क्रमांक 199/2024 आणि विरुध्द गटाने दिलेल्या तक्रारीनुसार 200/2024 दाखल झाले. या गुन्ह्यातील नावे लिहिलेल्या आरोपींना शोधण्याची सुचना विक्रांत देशमुख यांना करण्यात आल्यानंतर ते महाशय नांदला गावातून पोलीस अधिक्षक तेथे बसलेले असतांना निघून गेले. जातांना आपला फोन पण बंद केला.
अर्धापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांमध्ये मौजे नांदला दिग्रस येथील पोलीस पाटलांसह 8 जणांना अटक झाली. त्यातील तीन अद्याप पोलीस कोठडीत आहेत. इतर 15 ते 20 जणांचा शोध अर्धापूर पोलीस घेत आहेत.
आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारण्याचा प्रकार ही एक म्हण आहे. विक्रांत देशमुखने 28 एप्रिल रोजी असाच काहीसा प्रकार घडविला आणि या बदल्यात त्यांना निलंबित केल्याचे आदेश पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केले आहेत. आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडणे हे आवश्यक काम असतांना त्याकडे दुर्लक्ष कसे महागात पडते त्यातीलच हा एक प्रकार आहे.