पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनाचा 1 मे रोजी सकाळी शासकीय समारंभ

नांदेड – महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिवस समारंभ बुधवार 1 मे 2024 रोजी वजीराबाद पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सकाळी 8 वाजता राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 पुर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेत. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया बँग सोबत आणू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही केले आहे.

महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिवस समारंभ 1 मे 2024 रोजी साजरा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे 25 एप्रिल 2024 रोजी परिपत्रक निर्गमित झाले आहे. या परिपत्रकात नमूद केल्यानुसार सर्व विभाग प्रमुखांनी कार्यक्रमाचे आयोजन करावे. तसेच ध्वजारोहण व्यवस्थीतरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला रंगीत तालीम घ्यावी. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या 2 जानेवारी 2024 रोजीच्या पत्रान्वये महत्वाचे दिवस साजरा करण्यासंदर्भात आदर्श आचारसंहिते बाबत दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!