नांदेड(प्रतिनिधी)-एका जेसीबी चालकाला एकटे गाठून 2 जणांनी त्याच्याकडून 1 लाख 36 हजार 580 रुपयांची लुट केली आहे. हा प्रकार निळा रस्त्यावरील सम्राट धाब्याजवळ घडला.तसेच शाहुनगर वाघाळा येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाचे घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 78 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
सागर देवचंद खंदारे हे जेसीबी चालक दि.23 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 ते 8.10 वाजेदरम्यान आपल्या दुचाकीवरून त्यांच्या मित्रासह निळा ते नांदेड असा प्रवास करत असतांना त्यांना आलेल्या नैसर्गिक कॉलसाठी ते सम्राट धाब्याजवळ थांबले. त्यावेळी दुसऱ्या एका दुचाकीवर दोन जण तेथे आले आणि चाकुचा धाक दाखवून त्यांच्या मित्राला म्हणाले की, तुमच्याकडचे पैसे, सोन काढून द्या. यात झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सागर खंदारे आणि त्यांच्या मित्राच्या गळ्याला चाकू लावला आणि या धाकावर त्यांनी 6 ग्रॅम सोन्याची अंगठी 36 हजार रुपये किंमतीची 4.5 तोळे वजनाची चांदीची साखळी 3 हजार रुपये किंमतीची, मित्राच्या खिशातील 21 हजार रुपये रोख रक्कम, बोटातील एक अंगठीचा तोडा 76 हजार 580 रुपयांचा असा एकूण 1 लाख 36 हजार 580 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक रमेश वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गोपाळ इंद्राळे अधिक तपास करीत आहेत.
सेवानिवृत्त शिक्षक माधव हरी राजकौर रा.शाहुनगर वाघाळा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 एप्रिलच्या मध्यरात्री 1 ते 3 वाजेदरम्यान ते आणि त्यांचे कुटूंबिय घरात झोपले असतांना कोणी तरी चोरट्यांनी चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात मुलीच्या घराच्या बांधकामासाठी ठेवलेली 4 लाख रुपये रोख रक्कम आणि 12 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत किंमत 78 हजार 700 रुपये असा एकूण 4 लाख 78 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरू नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे अधिक तपास करीत आहेत.