किनवट,(प्रतिनिधी)-चिखली ता. किनवट येथील ग्रामसेवकाने 5 हजारांची लाज घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास गजाआड केले आहे.
दिनांक 18 एप्रिल रोजी एका 36 वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली की, मौजे मांडवी येथील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत ग्रामसेवक प्रेमसिंग मोतीराम आडे हे त्यांच्या मोकळ्या जागेची भूखंडाची नोंदणी ग्रामपंचायत चिखली येथील रजिस्टर 8 (अ) मध्ये करून घेण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागणी करीत आहेत.
दिनांक 23 एप्रिल रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबतच्या लाच मागणीची पंचां समक्ष पडताळणी केली आणि पडताळणी झाल्यावर ग्रामसेवक प्रेमसिंग मोतीराम आडेने आपल्या घरी गोकुंदा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे 5 हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास गजाआड केले आहे. पोलीस ठाणे किनवट येथे प्रेमसिंग आडे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे,पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले पोलीस अंमलदार सूर्यकांत वडजे, राजेश राठोड, विनयकुमार नुकलवार, सय्यद खदीर सय्यद हकीम पाशा, मोतीराम सोनटक्के यांनी ही कार्यवाही पूर्ण केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणताही शासकीय अधिकारी /कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी व्यक्ती/ एजंट यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास याबाबतची माहिती दूरध्वनी क्रमांक 02462- 253512 आणि टोल फ्री क्रमांक 1064 वर माहिती द्यावी.