नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभागाने निवडणुकीत काम करणाऱ्या लोकांसाठी भत्ता देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. पण दुर्देवाने या भत्यातील लोकांमध्ये पोलीसांचा कुठेच पत्ता नाही. मागील निवडणुकीचा भत्ता पोलीसांना द्यावा म्हणून शासन निर्णय जारी केला होता. त्या शासन निर्णयानुसार पोलीसाला जवळपास 30 रुपये भत्ता मिळण्याची शक्यता होती पण ते 30 रुपये अद्याप मिळाले की नाही याची काही माहिती प्राप्त होवू शकली नाही. नवीन लोकसभा निवडणुकीत तर पोलीस विभागाचे नाव भत्ता देण्याच्या यादीतच नाही.
महाराष्ट्र शासनाच्या सर्वसामान्य प्रशासन विभागाने 18 एप्रिल 2024 रोजी एक शासन निर्णय जारी केला असून त्यावर विभागाचे अवर सचिव योगेश गोसावी यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणुक भत्ता देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार क्षेत्रीय दंडाधिकारी यांना 1500 रुपये, मतदान केंद्र अध्यक्ष व मतमोजणी पर्यवेक्षक 350 रु. प्रत्येक दिवसाकरीता, मतदान अधिकारी, मतमोजणी सहायक 250 रुपये प्रत्येक दिवसाकरीता, चतुर्थ श्रेणी कर्मचारी 200 रु. दर दिवसासाठी, फिरते पथक, व्हिडीओ निरिक्षण पथक, लेखा पथक यांना 1200 रु., नियंत्रण कक्ष, काल सेंटरमधील कर्मचारी, प्रसार माध्यमांना प्रमाणपत्र व देखरेख करणारी यंत्रणा 1000 रु. फिरते पथक, स्थिर पथक, खर्च नियंत्रण सेल 200 रु. प्रत्येक दिवसासाठी, आयकर निरिक्षक 1200 रु, सुक्षम निरिक्षक 1000 रु. असा भत्ता देण्यात येईल.
मतदान केंद्र, मतमोजणी केंद्रावर निवडणुक कर्तव्य अधिकारी, कर्मचारी यांच्या सहीत पोलीस अधिकारी, कर्मचारी, मोबाईल पथके, होमगार्ड, वन रक्षक दल, ग्रामरक्षक दल, एनसीसीसी छात्र, माजी सैनिक, स्वयंसेवक यांच्याकरीता भोजनाची पॉकीट किंवा सोम्य आहार. त्यात भोजनाची पॉकीट किंवा प्रत्येक दिवसाकरीता 150 रु. देण्यात येतील. निवडणुक कर्तव्य नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना 100 टक्के प्रवास भत्ता, दैनिक भत्ता, त्यात 100 टक्के रक्कम एक तर निवडणुक कर्तव्य पुर्ण केल्याच्या 24 तासाच्या आत किंवा आगाऊ. दुसऱ्या पध्दतीने 80 टक्के रक्कम अगाऊ आणि 20 टक्के रक्कम निवडणुक पुर्ण झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत देण्यात येईल.
या शासन निर्णयामध्ये निवडणुक जाहीर झाल्यापासून ते निवडणुक पुर्ण होईपर्यंत काम करणाऱ्या पोलीसांच्या भत्याबद्दल प्रत्यक्ष काही उल्लेख नाही. मतमोजणी केंद्रावर तैणात करण्यात आलेल्या पोलीसांना वरील तकत्यात नमुद केल्याप्रमाणे दर लागू राहतील असे लिहिले आहे. पण ती रक्कम किती याचा काही उल्लेख नाही. हा शासन निर्णय राज्य शासनाने संकेतांक क्रमांक 2024041912251029307 प्रमाणे राज्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
मागील निवडणुकीमध्ये सुध्दा असेच काही परिस्थिती होती. त्यातील मागील निवडणुकीतील भत्ता पोलीसांना देण्यात यावा असे आदेश काही दिवसांपुर्वीच शासनाने शासन निर्णयानुसार जाहीर केले होते. त्याचे गणित लावले असता प्रत्येक पोलीसाला 30रुपये मिळतील असे उत्तर होते आणि ते सुध्दा प्रत्यक्ष मतदान केंद्रावर काम करणाऱ्या पोलीसांसाठी. मग इतर पोलीस निवडणुकीचे काम करत नव्हते काय हा प्रश्न आजच्या नवीन शासन निर्णयानंतर सुध्दा कायम आहे.