नांदेड(प्रतिनिधी)-आमच्या भागातील डुकरे तुमच्यामुळे गायब होत आहे. या कारणावरुन एका युवकावर तलवारीने हल्ला करून त्याचे बोटे कापून टाकणार्या एका पोलीसासह चार जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी जन्मठेप आणि प्रत्येकी 27 हजार 500 रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
दि.21 जून 2021 रोजी संजय संभाजी देवकर या युवकाला सायंकाळी 5.30 वाजता मच्छी मार्केट नागार्जुना हॉटेलजवळ किरपालसिंघ शेरसिंघ टाक, ज्योगिंदरसिंघ जगबिरसिंघ टाक, पोलीस सेवेत असलेला पण सध्या माजी पोलीस घुंगरुसिंघ जितसिंघ टाक, अनिल उर्फ अन्या मल्लिकार्जुन मठपती या चार जणांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. हल्याचे कारण तुझ्यामुळे आमची डुकरे(जनावरे) गायब होत आहेत.तुला संपविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असे होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात किरपालसिंघ शेरसिंघ टाक, ज्योगिंदरसिंघ जगबिरसिंघ टाक, पोलीस सेवेत असलेला पण सध्या माजी पोलीस घुंगरुसिंघ जितसिंघ टाक, अनिल उर्फ अन्या मल्लिकार्जुन मठपती या चार जणांविरुध्द भारतीय दंडसंहितेच्या कलम 307,143, 147, 148, 149, 324, 323,504 आणि 506 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 241/2021 दाखल झाला. या प्रकरणाचा तपास शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक उमाकांत पुणे यांनी करून न्यायालयात चार जणांविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालायत याप्रकरणी 10 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध झालेला पुरावा आणि दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश बांगर यांनी संजय संभाजी देवकरवर तलवारीने जिवघेणा हल्ला करून त्याची बोटे तोडणार्या किरपालसिंघ शेरसिंघ टाक, ज्योगिंदरसिंघ जगबिरसिंघ टाक, पोलीस सेवेत असलेला पण सध्या माजी पोलीस घुंगरुसिंघ जितसिंघ टाक, अनिल उर्फ अन्या मल्लिकार्जुन मठपती या चार जणांना दोषी जाहीर केले.
शिक्षा ठोठावतांना न्यायाधीश बांगर यांनी चौघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 10 हजार रुपये रोख दंड, कलम 324 प्रमाणे तिन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 5 हजार रुपये रोख दंड, 323 प्रमाणे एक वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 1 हजार रुपये रोख दंड, 504 प्रमाणे दोन वर्ष सक्तमजुरी प्रत्येकी 2 हजार रुपये रोख दंड, कलम 506 प्रमाणे दोन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 3 हजार रुपये रोख दंड, 143 प्रमणे सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी 1 हजार रुपये रोख दंड, कलम 148 प्रमाणे तिन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 5 हजार रुपये रोख दंड या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरिक्षक आर.टी.ढोले यांनी काम पाहिले.