नांदेड(प्रतिनिधी)-भगवान पार्श्र्वनाथाची पंचधातुची मुर्ती चोरणाऱ्या आरोपीला सीसीटीव्हीच्या माध्यमातून पकडून शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने मुर्ती सुध्दा जप्त केली आहे.
दि.8 एप्रिल रोजी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे भगवान पार्श्र्वनाथाची मुर्ती चोरी झाल्याबाबत गुन्हा क्रमांक 121/2024 दाखल झाला होता. चोरी झालेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीची ओळख पटवली आणि त्याला ताब्यात घेतले. भगवान पार्श्र्वनाथाची मुर्ती चोरणाऱ्या चोरट्याचे नाव अविनाश बद्रीनारायण परडे (34) रा.बजाजनगर नांदेड असे आहे. या मुर्तीची किंमत 10 हजार रुपये आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सी.एम. यांनी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे,पोलीस अंमलदार देवसिंह सिंगल, शेख अझरोद्दीन, लिंबाजी राठोड, दत्ता वडजे, राहुल लंगोटे आदींचे कौतुक केले आहे.
सीसीसटी फुटेजमधील जुगार अड्डा मात्र दिसत नाही
पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या हद्दीत गणेशनगर सोसायटी आहे. या सोसायटीने तेथील रहिवाशांना होणाऱ्या त्रासासाठी आपल्या संपुर्ण सोसायटीला सीसीटीव्ही फुटेज लावले आहे. याच भागात मारोती मंदिराच्या पाठीमागे सुरू असलेला जुगार अड्डा मात्र शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाला सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून का दिसत नाही हा प्रश्न गणेशनगर सोसायटीमध्ये उपस्थित होते आहे.