अर्धापूरच्या पोलीस निरिक्षकांनी ओव्हरलोड विटांच्या पाच गाड्या पकडल्या; 1 लाख 40 हजारांचा दंड

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूरच्या पोलीस निरिक्षकांनी स्थिर निरिक्षण केंद्रावर जातांना पाच विटांच्या गाड्या पकडल्या आहेत. या सर्व गाड्या त्यांना विहित असलेल्या वजनापेक्षा जास्त वजन (ओव्हर लोड) असल्याने त्यांच्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने कार्यवाही करून घेतली. त्या सर्व पाच गाड्यांना मिळून 1 लाख 40 हजारांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
5 एप्रिल रोजी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम आपल्या हद्दीत गस्त करत असतांना भोकर फाट्यावर लावण्यात आलेल्या स्थिर निरिक्षण केंद्राला भेट दिली. तेथून परत येत असतांना साईबाबा मंदिरासमोर त्यांनी टेम्पो क्रमांक एम.एच.37 बी.0080, एम.एच.16 ए.ई.0802, एम.एच.26 बी.ई.8074, एम.एच.42 ए.क्यु. 1720 आणि एम.एच.26 एच.0151 अशा पाच टेम्पोंना थांबविले. त्या गाड्यांवर चालकांची नावे शिवानंद सटवाजी एडके, रणजित देविदास हाटकर, शेख मोईन शेख यासीन, धम्मपाल रोहिदा हनमंते सर्व रा.वाजेगाव आणि शिवराम विठ्ठल बाऊलकर रा.लालवाडी अशी आहेत.
चंद्रशेखर कदम यांनी या सर्व गाड्या अर्धापूर येथील किसान वजन काटा येथे नेऊन त्यांचे वजन तपासले असता त्या गाड्यांमध्ये भरलेल्या विटा कंपनीने विहित केलेल्या वजनापेक्षा जास्त (ओव्हर लोड) होत्या. त्यामुळे चंद्रशेखर कदम यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांना पत्र देऊन तेथील अधिकारी बोलावले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या पाच टेम्पोंना प्रत्येकी 28 हजार रुपये असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा दंड आकारला आहे. विटांच्या गाड्यांवर कार्यवाही केली तेंव्हा चंद्रशेखर कदम यांच्यासोबत पोलीस उपनिरिक्षक बाबुराव जाधव आणि पोलीस अंमलदार कदम हे हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *