प्रशिक्षणाला दांडया मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार

नांदेड दि. २: निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज होत असताना काही कर्मचारी प्रशिक्षणाला अनुपस्थितीत राहत आहेत. अशा सर्व कर्मचाऱ्यावर प्रशासनाचे लक्ष असून अशा जबाबदारीपासून दूर पळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याचे संकेत आहे.

लोकशाही यंत्रणेमध्ये सर्वात महत्त्वाचे पर्व असणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रत्येक विभागाचे कसून प्रशिक्षण दिले जात आहे स्वतः जिल्हाधिकारी व सर्व वरिष्ठ अधिकारी या काळात 24 तास उपलब्ध आहेत. मात्र तरीही अनेक कर्मचारी निवडणुकीच्या या पर्वात महत्त्वाच्या प्रशिक्षणाला दांडी मारत असल्याचे लक्षात आले आहे. प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचे लक्ष असून त्यांच्या बदल्यात दुसऱ्यांना जबाबदारी देण्याऐवजी त्याच कर्मचाऱ्या तीच जबाबदारी देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

काही कर्मचारी दांडी मारल्यानंतर आपल्याकडून काम काढून घेईल अशा अपेक्षेवर असून त्यांच्यावर आता कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये कोणीही कोणती ड्युटी बदलून देऊ नये. या संदर्भातले अवास्तव व वस्तुनिष्ठ नसणारे निवेदन व मागण्या याकडे दुर्लक्ष करा, असे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे.

लोकशाहीतल्या महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पुढे येणे आवश्यक असते. अतिशय जबाबदारीने व बिनचूकपणे सर्व कामे करणे, प्रत्येक जबाबदारी पार पाडणे आवश्यक असते. शासनाची प्रतिमा उंचावण्याची ही संधी असून अतिशय आनंदाने ही जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *