अल्पवयीन बालिकेला त्रास देणाऱ्या युवकाला सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-ईस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या दोन युवकापैकी एकाला नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी एक वर्ष सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील दोन जणांपैकी एकाची न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी मुक्तता केली आहे.
ईस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेने 29 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार त्या दिवशी रात्री 9 वाजता माझ्या वडीलांच्या नावाने आवाज आल्याने मी दार उघडून पाहिले. त्यावेळी एका चार चाकी मालवाहतुक गाडीवरील किनर राजरत्न उर्फ बाळ्या व्यंकटी कांबळे आणि विकास श्रावण आंबेकर हे दोघे दुचाकीवर बसून आले. त्यांनी मला जवळ बोलवले असता मी काय काम असे विचारले आणि मी जवळ गेल्यानंतर त्या दोघांनी माझा हात पकडून मला बळजबरी दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न केला. मी आरडा ओरड केली असता त्या दोघांनी मला बळजबरीने दुचाकीवर बसवून कंचेली गावाच्या पाट्याजवळ नेले. तेथे विकास आंबेकरने मोटारसायकलवरून उतरून दिले. विकास दुचाकी घेवून परत गेला. मला रात्रभर जंगलात ठेवले. माझे नातलग माझा जंगलात शोध घेत असतांना याची चाहुल लागल्याने राजरत्न उर्फ बाळ्या कांबळे पळून गेला आणि नातलगांनी मला घरी आणले त्यानंतर मी तक्रार देत आहे.
या तक्रारीवरुन राजरत्न उर्फ बाळ्या व्यंकटी कांबळे आणि विकास श्रावण आंबेकर या दोघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 363, 366(अ), 376, 34 सोबत 4 आणि 6 पोक्सो कायद्याची कलमे नुसार गुन्हा क्रमांक 115/2022 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक रघुनाथ शेवाळे यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. सरकार पक्षाने या खटल्यात आठ साक्षीदारांची तपासणी न्यायालयासमक्ष केली. गुन्ह्यात समोर आलेला पुरावा आणि सरकार पक्ष आणि बचाव पक्ष यांचा युक्तीवाद ऐकून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश तथा विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश आर.एम. पांडे यांनी या दोन आरोपींमधील राजरत्न उर्फ बाळ्या व्यंकटी कांबळे यास कलम 354(अ) नुसार एक वर्ष सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना शिक्षेची तरतूद करण्यात आली. सरकार पक्षाच्यावतीने या प्रकरणात जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख आणि विशेष सरकारी अभियोक्ता ऍड.सौ.एम.ए. बत्तुल्ला (डांगे) यांनी काम केले. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस अंमलदार एम.पी.गिमेकर यांनी काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *