नांदेड (जी.मा .का.)-:-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने उष्णतेच्या लाटेच्या प्रभावा पासून बचाव करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाकडून सूचना निर्गमित झाल्या आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात मतदानाच्या कालावधीत मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उष्णतेच्या लाटेच्या प्रभावापासून बचाव होण्यासाठी आरोग्य विभाग काळजी घेणार आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी यांना उष्णतेच्या लाटेच्या प्रभावापासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक ती वैद्यकीय सुविधा व औषध उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
याबाबत नोडल अधिकारी व सहा. निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी आरोग्य विभागाकडून उष्णतेच्या लाटेच्या प्रभावापासून मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचा बचाव करण्यासाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन घ्याव्यात.