28 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 164 महागडे मोबाईल नांदेड सायबर पोलीस ठाण्याने शोधले

70 मोबाईल पोलीस अधिक्षकांच्या हस्ते मालकांना परत
नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक ठिकाणातून महागडे मोबाईल गायब होण्याचे अनेक प्रकार घडतात. यातील 28 लाख 25 हजार 300 रुपयांचे 164 मोबाईल नांदेडच्या सायबर गुन्हा शाखेने जप्त केले आहेत. त्यातील 70 मोबाईल आज पोलीस अधिक्षकांच्या हस्ते मालकांना परत देण्यात आले. इतर मोबाईलची माहिती नांदेड पोलीसांनी फेसबुक पेज Nanded Police आणि ट्विटर अकाऊंट @NandedPolice यावर आयएमईआय नंबरसह प्रसाारीत केले आहे. जनतेने आपले मोबाईल ओळखून आणि त्यातील त्याची ओळख पटवून घेवून जाण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणावरून अनेक महागडे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारीत जमा करण्यात आल्या. सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी हे मोबाईल शोधण्याची मोहिम हाती घेतली. त्यात त्यांना 164 मोबाईल शोधण्यात यश आले. या 164 मोबाईलची किंमत 28 लाख 25 हजार 300 रुपये आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या कार्यकाळात नांदेड सायबर पोलीस ठाण्याने एकूण 1 हजारपेक्षा जास्त मोबाईल शोधले आहेत. आज शोधण्यात आलेल्या मोबाईलपैकी 70 मोबाईल त्यांच्या मालकांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी परत केले आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक गंगाप्रसाद दळवी, पोलीस अंमलदार सुरेश वाघमारे, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, रेशमा पठाण, दाविद तिडगे, काशिनाथ कारखेडे, मोहम्मद आसीफ, दिपक शेवाळे, विलास कदम, राजू बोधगिरे, अकबर पठाण, व्यंकटेश सांगळे यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *