निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ;खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचेआवाहन

नांदेड-लोकसभा निवडणूक ही अतिशय गंभीर अशी प्रक्रिया असून प्रत्येक कर्मचारी हा या काळात भारत निवडणूक आयोगाचे कान व डोळे आहेत. त्यामुळे उमेदवाराच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून खर्चाचा सर्व तपशील योग्य पद्धतीने नोंदला जाईल याकडे लक्ष ठेवा, प्रत्येक कामाचे व्हिडिओ चित्रण काटेकोरपणे करा,असे आदेश आज नांदेड लोकसभा क्षेत्राचे निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी दिले.

नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी ८५- भोकर, ८६- नांदेड उत्तर, ८७- नांदेड दाक्षिण या तीन विधानसभेसाठी एक तर ८९- नायगाव, ९०- देगलूर, ९१- मुखेड या तीन अन्य विधानसभा क्षेत्रासाठी दुसरे असे दोन खर्च निवडणूक निरीक्षक म्हणून वरिष्ठ सनदी अधिकारी नांदेडसाठी नियुक्त करण्यात आले आहे. यापैकी खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांचे आगमन झाले असून दुसरे खर्च निवडणूक निरीक्षक मग्पेन भुटीया रात्री दाखल होणार आहेत.

 

आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन मध्ये आयोजित बैठकीत त्यांनी यावेळी निवडणुकीतील खर्चाच्या संदर्भातील सर्व यंत्रणांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. जनार्दन पक्वान्ने यांच्यासह विविध कक्षाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

लोकसभा निवडणूक ही अतिशय गंभीर प्रक्रिया असून गांभीर्याने पूर्ण प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असते. त्यामुळे विविध तपासणी पथकांनी पोलिसांच्या मदतीने रोकड,साहित्य, मद्य या संदर्भातील कोणतीही तस्करी जिल्ह्यात होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्ह्यातील हमरस्त्यांपासून गल्लीबोळातून होणाऱ्या वाहतुकीवर देखील लक्ष ठेवून तपासणी आणखी सक्रिय करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

 

उमेदवाराच्या प्रचाराच्या खर्चावर देखील यावेळी लक्ष ठेवण्याचे त्यांनी सांगितले उमेदवारांच्या जाहिराती, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवरील प्रचार – प्रसार,सोशल माध्यमांवरील प्रचार – प्रसार याबाबत गांभीर्याने लक्ष ठेवण्याचे त्यांनी सुचविले. प्रमाणीकरण केल्याशिवाय कोणीही जाहिराती प्रसारित करत असेल तर त्यावर माध्यम प्रमाणीकरण व नियंत्रण समितीने लक्ष वेधण्याचे त्यांनी निर्देशित केले.

 

लोकसभा ही मोठी निवडणूक असून त्याचे गांभीर्य अनेक वेळा काही उमेदवारांना नसते. राजकीय पक्षांच्या विविध बैठकांमध्ये यापूर्वी ही निवडणूक लढणे व त्यासाठीच्या प्रक्रिया समजावून सांगण्याचा टप्पा पार पडला आहे. आता उमेदवाराच्या खर्चावर काटेकोर लक्ष देण्याची वेळ आली असून खर्च कसा नाही झाला, हे सिद्ध करणे उमेदवाराचे काम असते. योग्य खर्च व तपशील सादर न करणारे उमेदवारांवर गुन्हे दाखल होतात व त्यांना अनेक निवडणुका लढता येत नाही. त्यामुळे सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण करण्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

यावेळी त्यांनी यापूर्वी जिल्हा प्रशासनामार्फत झालेल्या प्रशिक्षणाचा आढावा घेतला. उपस्थित निवडणूक कर्मचाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करून त्यांनी आतापर्यंत केलेल्या तयारीची देखील चाचपणी केली.

 

वेगळा बॉक्स फोटो सह घ्यावा

 

निवडणूक खर्च निरीक्षकांशी कोणीही साधू शकतो संपर्क

नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी ८५- भोकर, ८६- नांदेड उत्तर, ८७- नांदेड दाक्षिण या तीन विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून दाखल झालेले डॉ. दिनेश कुमार जांगिड हे नांदेड विश्रामगृहाच्या व्हीआयपी रूम नंबर तीन येथे निवासी आहेत. जिल्ह्यातील सामान्य नागरिकापासून कोणीही त्यांना कार्यालयीन वेळेमध्ये भेटू शकतो. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोणतीही तक्रार, गऱ्हाणी, सूचना तोंडी लेखी मांडू शकतो. त्यांचा मोबाईल क्रमांक ७७०९३०७८०९ आहे. निवडणुकीमध्ये होणाऱ्या पैशांच्या गैरव्यवहारापासून तर उमेदवारांच्या संदर्भात कोणतीही माहिती निरीक्षकांना दिली जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!