नांदेड(प्रतिनिधी)- लोहाचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्याबद्दल मी दिलेला अर्ज परत घ्यावा म्हणून मटका चालवणारे, गुडगुडी चालवणारे व अवैध वाळुचा व्यवसाय करणारे लोक मला धमक्या देत आहेत. तसेच माझ्या आडगाव ता.लोहा येथील शेतात पोलीस कोणतीही कल्पना न देता जात आहेत. यावरुन मला काही तरी फसविण्याचा कट आहे. याबद्दलची चौकशी करावी असा अर्ज शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे लोहा तालुकाप्रमुख चंद्रकांत मोहनराव क्षीरसागर यांनी विशेष पोलीस महानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र आणि पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे दिला आहे.
लोहा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 7 मार्च रोजी चंद्रकांत मोहनराव क्षीरसागर यांच्या अर्ज घेवून पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर विरुध्द फौजदारी खटला क्रमांक 119/2024 दाखल केला आहे. या खटल्यात भारतीय दंड संहितेची 294, 504, 506 आणि 323 ही कलमे जोडण्यात आली आहेत. त्यानंतर चंद्रक्रांत क्षीरसागर यांच्या मोबाईलवर एसएमएस करून मटका चालविणारे, गुडगुडी चालवणारे आणि अवैध वाळुचा व्यवसाय करणारी मंडळी ओमकांत चिंचोळकर यंाच्या सांगण्यावरून अर्ज उचलून घे अशा धमक्या देत आहेत. या संबंधाचे व्हॉटसऍप मॅसेज चंद्रकांत क्षीरसागर यांनी अर्जासोबत जोडले असल्याची माहिती वास्तव न्युज लाईव्हला दिली. चंद्रकांत क्षीरसागर यांनी विशेष पोलीस महानिरिक्षक आणि पोलीस अधिक्षकांना दिलेला अर्ज सुध्दा वास्तव न्युज लाईव्हला व्हाटसऍपद्वारे पाठविला आहे.
दि.20 मार्च रोजी सकाळी 8.30 ते 10.30 वाजेदरम्यान माझ्या आडगाव ता.लोहा येथील शेतात पोलीस जमादार किरपणे, पोलीस जमदार खाडे, पोलीस संजय मेकलवार व इतर सहा ते सात पोलीस माझ्या आई-वडीलांना किंवा मला कोणतीही पुर्व सुचना न देता जिप घेवून शेतात गेले. ही बाब मला गावकऱ्यांनी सांगितली तेंव्हा मी जमादार किरपणे व खाडे यांना फोन करून माझ्या शेतात का गेला होतात असे विचारले असता ते चिंचोळकर साहेबांना विचारा असे म्हणून फोन कट करत आहेत. पोलीस लपवून,चोरून माझ्याविरुध्द खोटे पुरावे पेरुन माझ्या विरुध्द वापरण्याच्या तयारीत आहेत. लोहा पोलीस लपवून किंवा चोरून आम्हाला काही एक न सांगता माझ्या शेतात जाऊन काही तरी गांजा, दारु किंवा शस्त्र लपवून ठेवून मला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याचा कट रचत आहेत असे अर्जात लिहिले आहे. माझ्या विरुध्द दाखल असलेले गुन्हे नक्कीच तपास करावा पण ते गुन्हे लोहा पोलीसांकडून काढून दुसऱ्या कोणत्या तरी पोलीस ठाण्याला किंवा पोलीस उपअधिक्षक कार्यालयाला वर्ग करावेत तरच लोहा पोलीस खोटा तपास करत आहे हे दिसेल. माण्याविरुध्द कोणतेही पंचनामे करतांना किंवा तपास करतांना शासकीय पंच वापरण्यात यावेत व त्या पंचनाम्याची व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यात यावी अशी विनंती केली आहे. माझ्या शेतात जातांना पोलीसांनी आडगाव येथील कोणत्याही जबाबदार नागरीकाला माहिती देवून किंवा आडगावच्या पोलीस पाटलांना माहिती देवून नागरीकांच्या समोर स्वत:ची अंग झडती देवून माझ्या घरात किंवा शेतात प्रवेश करण्याची विनंती केली आहे.
माझ्याविरुध्द दाखल करण्यात आलेला शस्त्र कायद्याप्रमाणेचा गुन्हा क्रमांक 61/2024 मधील फोटो मी 12 ते 15 वर्षापुर्वी काढलेला आहे. माझ्या हातातील तलवार मुद्रा स्टुडीओमधील दुकानातील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी सुध्दा याच मुद्रा स्टुडीओमध्ये शिवाजी महाराज बनलेल्या तरुणाच्या हातात सुध्दा तीच तलवार आहे जी माझ्या हातात आहे. 20 मार्च रोजी मुद्रा फोटो स्टुडिओचे मालक बळीराम पवार व पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या बातम्या कव्हर करणारे अंबादास पवार हे पोलीस ठाणे लोहा येथे एकत्र आले होते. यावरुन काही तरी कट रचला जात आहे असे दिसते. आम्ही सर्वांनी मिळून शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी काढलेला सामुहिक फोटो अंबादास पवार याने 20 मार्च रोजीच स्वत:च्या फेसबुक खात्यावर अपलोड केला आहे. तेंव्हा या सर्व बाबींना योग्य चौकशी करून पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस जमादार खाडे, पोलीस जमादार किरपणे, पोलीस संजय मेकलवार व मला नाव माहित नसलेली सहा ते सात पोलीसांविरुध्द चौकशी करून योग्य कायदेशीर कार्यवाही करावी अशी विनंती आपल्या अर्जात चंद्रकांत मोहनराव क्षीरसागर यांनी केली आहे.
चंद्रकांत क्षीरसागर विरुध्द सुरू करण्यात आलेले हे खलबत त्यांनी लोहा शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी अर्ज दिल्यानंतर सुरू झाले आहे. महेंद्रा फायनान्सच्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळी मंडळी आहे. चंद्रकांत क्षीरसागरने पैसे भरल्यानंतर सुध्दा त्यांच्याविरुध्द महेंद्रा फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला हा सुध्दा हास्यास्पद प्रकार आहे.