नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी अवैधरित्या केलेला मोठा शस्त्रसाठा पकडला आहे. त्याबाबत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पकडलेल्या एका व्यक्तीला मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन-देसरडा यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. याा गुन्ह्यातील दोन आरोपी फरार आहेत.
वजिराबाद पोलीसांनी जारी केलेल्या प्रेसनोटनुसार दि.18 मार्च रोजी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम, सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.डी.वटाने, पोलीस अंमलदार अंकुश पवार, विजयकुमार नंदे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, रमेश सूर्यवंशी, बालाजी कदम, मेघराज पुरी, शेख इमरान, भाऊसाहेब राठोड, शुभांगी कोरेगावे, अर्चना लांडगे, चंद्रकांत स्वामी, श्रीराम दासरे आदींनी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन दुकांनावर छापा टाकला. त्या ठिकाणाहून पोलीसांनी धार-धार व घातक स्वरुपाच्या 49 तलवारी, 94 खंजीर, 7 गुप्ती आणि 2 बिचवे अशी हत्यारे जप्त केली. या सर्व हत्यारांची एकूण किंमत 1 लाख 23 हजार 400 रुपये आहे. या संदर्भाने पोलीसांनी संतोष आबाराव शिरफुले (35) रा.नंदीग्राम सोसायटी नांदेड यास अटक केली. या शस्त्र साठा जप्ती प्रकरणात भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 आणि 7/25 नुसार गुन्हे क्रमांक 135 आणि 136 दाखल करण्यात आला आहे. पकडलेल्या संतोष शिरफुलेला मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन-देसरडा यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे आदींनी एवढा मोठा शस्त्र साठा जप्त करणाऱ्या वजिराबाद पोलीसांचे कौतुक केले आहे.