नांदेड(प्रतिनिधी)-सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार मुळ वेतनाची फरक रक्कम अदा करण्यास मान्यता दिली आहे. हा आकडा एकूण 45 लाख 43 हजार 929 रुपये आहे. पण पोलीसांच्या संख्येने या रक्कमेला भागाकार केल्यानंतर जवळपास प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना 30 रुपये 29 पैसे मिळणार आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सन 2019 ला पोलीस विभागातील अधिकारी व पोलीस अंमलदारांना 8 रुपये, 12 रुपये, 25 रुपये, 32 रुपये अशा प्रकारे मानध मिळाले होते. यामध्ये फक्त निवडणुकांच्या बुथवर काम करणाऱ्या अधिकारी आणि पोलीस अंमलदारांचाच समावेश होता. वास्तविक सर्व पोलीस दल निवडणुकांच्या कामात लागलेले असते. त्यावेळी वाटप करण्यात आलेल्या मानधनाबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. त्यावेळी आम्ही सुध्दा त्याबद्दल आवाज उठवला होता. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी 19 मे 2022 आणि 12 डिसेंबर 2023 रोजी दिलेल्या पत्रांचा संदर्भ घेवून महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. या आदेशावर महाराष्ट्र शासनाचे अव्वर सचिव जहांगिर के. खान यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. हा आदेश संकेतांक क्रमांक 202403111242012929 प्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
6 व्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार मुळ वेतनाच्या फरकाची रक्कम राज्य पोलीस दलासाठी 45 लाख 43 हजार 929 रुपये अदा केले जाणार आहेत.मुळ वेतन म्हणून एक महिन्याचे वेतन पारिश्रमिक मानधन असे देण्याचे आदेश आहेत आणि त्यातील फरक हा 45 लाख 43 हजार 929 रुपये आहे. महाराष्ट्रात आजच्या परिस्थितीत जवळपास 1 लाख 70 हजार पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार आहेत. या संख्येने जर 45 लाखांचा भागाकार केला तर याचे उत्तर 26 रुपये 72 पैसे असे येते. म्हणजे 2019 मध्ये निवडणुकीचे काम करणाऱ्या पोलीसांना ही फरकाची रक्कम मिळणार आहे. अर्थात सरासरीने 30 रुपये प्रत्येक पोलीसाला मिळतील असा आशय या शासन निर्णयामध्ये मिळतो.