स्थानिक गुन्हा शाखेने एका महिलेसह 4 जणांना पकडून 6 लाख 46 हजार 934 रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त केला

बसमध्ये प्रवेश करताना महिलांचे दागिने चोरणारी टोळी

नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने देगलूर येथील एक महिलेसह दोन पुरुष आणि कर्नाटक राज्यातील भालकी येथील एक पुरुष अशा चार जणांना पकडून बसमध्ये प्रवेश करताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरल्याचे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात बस मध्ये प्रवास करताना गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये प्रवेश करणाऱ्या महिलांचे आणि बस मध्ये बसलेल्या महिलांची नजर चुकवून महिलांचे सोन्याचे दागिने चोरी करण्याचे बरेच प्रकार घडले होते. त्या संदर्भाने वजीराबाद पोलीस ठाण्यात 4, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2, कंधार पोलीस ठाण्यात 2 आणि बारड, शिवाजीनगर, रामतीर्थ, माळाकोळी, माहूर आणि लोहा येथे प्रत्येकी एक असे महिलांच्या दागिने चोरीचे 14 गुन्हा दाखल आहेत.

या संदर्भाने समांतर तपास करताना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलिस अंमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, विलास कदम, गणेश धुमाळ, धम्मा जाधव, रणधीर राजवबंशी, गजानन बयनवाड,दीपक ओढणे, हेमलता भोयर, पंचफुला फुलारी, किरण बाबर, शेख कलीम आणि हनुमानसिंह ठाकुर यांनी दुर्गा मोहन हातवळणे (28) रा. देगलूर हिवराज रामचंद्र उपाध्य (51) रा.देगलूर, बालाजी उर्फ बळी गोविंद कोळगिरे (30) रा. देगलूर आणि प्रकाश तुकाराम वाघमारे (34) रा. कळणदाळ ता. भालकी जि. बिदर (कर्नाटक) हल्ली मुक्काम देगलूर अशा 4 जणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले 14 दागिने चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यातील एकूण 6 लाख 46 हजार 934 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. माळाकोळी येथे घडलेल्या गुन्ह्याबाबत या चोरट्यांकडून काही जप्त करण्यात आलेले नाही.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे.

घडलेल्या गुन्ह्यांमधील ज्यांचे दागिने चोरीला गेले होते त्या महिलांनी नांदेड पोलिसांना मनःपूर्वक धन्यवाद दिले आहेत.या 4 चोरट्यांना पुढील तपासासाठी वजीराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *