नांदेड,(प्रतिनिधी)- जागतिक महिला दिन महिला वैद्यकीय अधिकारी यांनी मागितलेली लाच स्वीकारल्यानंतर वैद्यकीय अधिकारी पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे.
डॉक्टर्स लेनमध्ये असलेल्या अर्पण रक्त केंद्र रक्तपेढीची तपासणी करण्यासाठी अतिरिक्त कार्यभार प्रादेशिक रक्त संक्रमण अधिकारी वर्ग एक डॉ. अश्विनी किशनराव गोरे या आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी केलेल्या तपासणीत तुमच्या रक्तपेढीतील त्रुटी काढायच्या नसतील तर एक लाख दहा हजार रुपये लाच मागितली. आपल्याकडे एवढे पैसे नाहीत असे तक्रारदाराने सांगितले,तेव्हा डॉ. अश्विनी गोरे म्हणाल्या तुमची रक्तपेढी बंद करण्याची कार्यवाही होईल या भीतीने तक्रारदाराने 7 मार्च रोजी डॉक्टर अश्विनी गोरे यांना 10 हजार रुपये दिले उर्वरित 1 लाख रुपये घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी अर्थात जागतिक महिला दिनी 8 मार्च 2024 रोजी त्यांनी आपले पती डॉ. प्रीतम तुकाराम राऊत यांना पाठवले हे दोन्ही डॉक्टर धाराशिव येथील रहिवासी आहेत
8 मार्च रोजी लाचेचे पैसे देण्यासाठी डॉ. प्रीतम तुकाराम राऊत यांनी तक्रारदाराला नांदेडच्या पोलीस अधीक्षक कार्यालय समोर बोलावले. त्यावेळी तक्रारदाराने सुद्धा डॉ. अश्विनी गोरे सोबत फोनवर याच माणसाला पैसे द्यायचे काय याची खात्री पंचांसमक्ष केली. तेव्हा तक्रारदाराने मी आज 50 हजार रुपये देत आहे उर्वरित पैसे नंतर देतो असे सांगितले तुम्ही दिलेला शब्द पाळा, ठरल्याप्रमाणे द्या, असे डॉ. गोरे म्हणाल्या आज सुट्टीचा दिवस असल्याने पैसे जमा करायला वेळ लागला असे तक्रारदाराने सांगितले तेव्हा डॉ. अश्विनी गोरे यांनी ठीक आहे माझ्या माणसाकडे द्या असे म्हणून फोन कट केला. प्रीतम तुकाराम राऊत याने लाचेचे 50 हजार रुपये स्वीकारतात लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी त्यास गजाआड केले.
प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपाधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गजानन बोडके, पोलीस अंमलदार राजेश राठोड, सय्यद खदीर, बालाजी मेकाले, अर्षद खान, प्रकाश मामुलवार आदींनी ही कार्यवाही पूर्ण केली. वजीराबाद पोलीस ठाण्यात डॉ. अश्विनी किशनराव गोरे (42) वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय उदगीर आणि अतिरिक्त कार्यभार प्रादेशिक रक्त संक्रमण अधिकारी वर्ग एक प्रादेशिक रक्त संक्रमण कार्यालय धाराशिव आणि डॉ. प्रीतम तुकाराम राऊत (48) वैद्यकीय अधिकारी अस्थिरोग तज्ञ वर्ग-१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गजानन बोडके करणार आहेत
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ग्रामसेविका आणि त्यांचा पती लाचेच्या जाळ्यात अडकल्याचा प्रकार धर्माबाद येथे घडला. त्यानंतर 8 मार्च जागतिक महिला दिनी डॉ. अश्विनी गोरे आणि डॉ. प्रीतम राऊत हे पती-पत्नी लाचेच्या जाळ्यात अडकण्याचा प्रकार घडला आहे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात केले की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम, एजेंट यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा दुरध्वनी क्रमांक 02462253512 टोल फ्रि क्रं.1064