नव उद्योजकांसाठी एक खिडकी योजना राबविणार –  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

  • नांदेड येथे एक दिवसीय गुंतवणूक परिषदेला व्यापार, उद्योग जगताचा प्रतिसाद

नांदेड:- जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात नवीन उद्योगांची वाढ होवून रोजगार निर्मिती होण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी भासू नये. त्यांची कामे सुलभ व वेळेत व्हावीत यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत एक खिडकी योजना राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. मिडलॅड हॉटेल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 

यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी शंकर केंदुळे, नगर रचनाकार पवनकुमार आलुरकर, जिल्हा कृषी अधिक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके आदीची उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक संघटना, संघटनेचे पदाधिकारी,नामांकित उद्योजक, औद्योगिक समूह, सनदी लेखापाल इ. ची उपस्थिती होती.

उद्योजकांना उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या विहित मुदतीत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे सेवा, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक प्रकल्प इ. यांना पायाभूत सुविधा देण्याबाबत तसेच गुंतवणूकदारांना उद्योगांसाठी लागणारे विविध परवाने, अनुषंगिक सवलती, अनुदान इ. बाबी उद्योगास प्राधान्याने दिल्या जातील असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच देशातंर्गत दळणवळणाची सोय सुलभ झाली असल्यामुळे उद्योगघटकांना नांदेड जिल्हयात गुंतवणूक करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

या परिषदेमध्ये विविध विभागाच्या शासकीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागाची कार्यप्रणाली विषद करुन भावी उद्योजकांना अडी-अडचणींबाबत मार्गदर्शन केले. या गुंतवणूक परिषदेत जिल्ह्यातील विविध उद्योग घटकाच्या उत्पादित मालाची स्टॉल उभारणी करण्यात आली होती. या स्टॉलला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देवून पाहणी केली.

 

या कार्यक्रमांमध्ये एखादा उद्योग कसा उभारावा यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्या त्या विभागाची काय कार्य आहेत, याची माहिती दिवसभराच्या कार्यशाळेत दिली. नांदेड जिल्हा हा उद्योग उभारणीसाठी पायाभूत सुविधांनी युक्त असून या ठिकाणी नव्या स्टार्टअप कंपन्यांनी झेप घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

 

नांदेड जिल्ह्याचे विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्हयाच्या व राज्याच्या विकासाला चालना देण्याचा या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचा उद्देश असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी प्रास्ताविकात सांगितले. या परिषदेमध्ये 60 उद्योग घटकामध्ये 1 हजार 450कोटी गुंतवणूक व 4 हजार रोजगार निर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने प्रकल्प संचालक शंकर पवार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *