नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील पानभोसी येथील माजी आमदार ईश्र्वरराव भोसीकर यांच्या दोन पुत्रांसह एका सुनेवर गावातीलच एका नागरीकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दि.5 मार्च 2024 रोजी नांदेड रेल्वे पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला असून पोलीस कार्यवाहीसाठी लोहा पोलीस ठाण्यात पाठविण्यात आला.
पानभोसी येथे माजी आ.ईश्र्वरराव भोसीकर यांच्या शैक्षणिक संस्था आहेत. या शैक्षणिक संस्थेचा कारभार माहितीच्या अधिकारात मागून घेवून यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी यासाठी फिर्यादीचे व मयताचे वडील व्यंकटराव भोसीकर हे उपोषणासाठी बसले होते. हा राग मनात धरुन यातील आरोपी प्राचार्य राजेंद्र ईश्र्वरराव भोसीकर, त्यांचे भाऊ संजय ईश्र्वरराव भोसीकर आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वर्षा संजय भोसीकर या तिघांनी मानसीक त्रास व त्यांच्या कुटूंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. मयत संजय व्यंकटराव भोसीकर यांनी त्यांचे भाऊ बसवेश्र्वर व्यंकटराव भोसीकर यांना उपचारादरम्यान मी वरील तिन्ही आरोपींच्या त्रासास कंटाळून व त्यांनी मला मनोरुग्ण आहेस असे हिनवल्यामुळे मी आत्महत्या करत होतो असे सांगितले. त्यावरून मयताचे भाऊ फिर्यादी बसवेश्र्वर भोसीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
यामध्ये मयत संजय भोसीकर हे दि.4 मार्च 2024 रोजी नांदेड येथील रेल्वे स्थानक प्लॅट फॉर्म क्रमांक 2 वरील ट्रेन क्रमांक 16594 बैंगलोर एक्सप्रेस या गाडीखाली येवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी तैनात असणाऱ्या रेल्वे सुरक्षा बल यांनी भोसीकर यांना उपचारासाठी रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
फिर्यादी बसवेश्र्वर भोसीकर यांनी नांदेड रेल्वे पोलीसात तक्रार दिली या अनुशंगाने नांदेड रेल्वे पोलीसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक 221/2024 कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे लोहा येथे वर्ग करण्यात येत असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रार अर्जात नमुद करण्यात आले आहे.