खुदा हाफिज प्रिन्स, जजाक अल्लाखैर; अशोकरावांसाठी सर्मपण

नांदेड(प्रतिनिधी)-खुदा हाफिज प्रिन्स अशा शब्दांमध्ये खा.अशोक चव्हाण यांचे माजी समर्थक त्यांना जजाक अल्लाखैर अशा शुभकामना पण देत आहेत.आता आम्ही कोठे वस्ती बसवावी, कोठे अनाथआश्रम शोधावे असेही बोलत आहेत. साहेब 23 फेबु्रवारी रोजी आपली मिरवणूक निघाली होती. या मिरवणूकीच्या रस्त्यावरील गल्या-गल्यामध्ये उभे राहिलेल्या लोकांमध्ये काय बोलणे चालले आहे. याचा पण मागोवा घ्या. तर बरेच काही लपलेले सत्य समोर येते.कारण आपण जे बोलतो ते शब्द असतात. ज्या बोलत नाही त्या भावना असतात आणि जे बोलायचे असते पण ते बोलता येत नाही ती असते मर्यादा आणि ती मर्यादा गल्लीबोळांच्या चर्चेमधून आपल्याला कळेल. काय हरकत नाही साहेब आता आपण भाजपामध्ये गेला आहेत.त्यामुळे वास्तव न्युज लाईव्हला सर्वात मोठी चिंता ही वाटते की, किती लोकांना भारतीय जनता पक्ष सोडून इतर राजकीय पक्षांचा शोध घ्यावा लागेल.

दि.11 फेबु्रवारी रोजी आपण कॉंगे्रस सोडल्याचा राजीनामा दिला. स्वत:ची राजकीय भुमिका ठरविण्यासाठी दोन दिवस लागतील असे सांगितले पण 24 तास पुर्ण होण्याअगोदरच दि.13 फेबु्रवारी रोजी विनायक चर्तुथी, श्री गणेश जयंती या दोन शुभ मुहूर्तांच्या दिवशी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यावेळी सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले की, अशोक चव्हाण यांचा उपयोग कोठे करायचा याची आम्हाला पुर्व कल्पना आहे. त्यांचे हे म्हणणे सत्यच आहे. कारण 2012 मध्ये आम्हीच आपल्याबद्दल लिहिले होते की, आता आपल्याला अशोक चव्हाण ऐवजी सम्राट व्हायचे आहे. बहुतेक आम्ही लिहिलेली बाब आपल्या लक्षात आली असेल आणि सम्राट होण्याचे इतर सर्व मार्ग बंद झाल्यामुळे आपण बहुदा हा नवीन रस्ता लक्षात घेतला असेल. कारण या नवीन रस्त्यात आज असे घडते आहे की, “चष्मदिद अंधा बन रहा है, बहरा सुने दलिल, झुटो का है दबदबा सचे हुये जलिल’ या बद्दल आम्हाला असे म्हणायचे आहे की, खऱ्या लोकांची अब्रु वेशीला टांगली जात आहे.

11 फेबु्रवारीला आपण कॉंगे्रस सोडली आणि 11 दिवसानंतर आपण नांदेडमध्ये आलात. शहरातला काही भाग आपल्या नावानी भगवा झालेला आहे, जय श्री रामच्या घोषणा दिल्या जातील. मेरे केशरी के लाल मेरा छोटासा काम मेरे रामजीसे कह देना मेरा जय सिया राम.. पहिल्याच पत्रकार परिषदेत आपण सुध्दा मुंबई भाजप अध्यक्ष म्हणण्याऐवजी मुंबई कॉंगे्रस अध्यक्षच म्हणाले होते. असे घडत राहिल. याला काही ऐवढ गांभीर्याने घेण्याचे गरज नाही. काही दिवसांत आपल्याला नवीन नावे, त्यांची पदे लक्षात राहतीलच.

प्रश्न देश, महाराष्ट्र यापेक्षा नांदेड जिल्ह्याचा महत्वपुर्ण आहे. निर्णय आपणच घेणार आहात. त्यावर आमचे काही लिखाण प्रभाव पडणार नाही. हे आम्हालाही माहित आहे.आम्ही आमची धारणा(परसेप्शन) करत नाही आहोत. सत्य मांडत आहोत. कारण परसेप्शन या शब्दावर आपण पत्रकारांवर रागात आहात हे आम्हालाही माहित आहे. म्हणून परसेप्शन या शब्दाला आम्ही विस्तृतपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर सर्वात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे की, आपल्याला जुन्या, निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सांभाळायचे आहे. कारण ही मंडळी कुठपर्यंत काय नेते याचा अंदाज आजपर्यंत कोणाला आलेला नाही. आपण मागच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे बी फार्म कोणाला द्यायचे हे ठरवले होते असे लोक सांगतात. म्हणजे आमच्या पेक्षा भारतीय जनता पार्टी आपल्याला जास्त कळते त्यातही आम्हाला काही शंका नाही असो.

आपण आलात त्यानंतर मागील महानगरपालिका जवळपास 75 टक्के भाजपमय झाली. हा प्रकार घडणारच होता. पुढेही घडत राहिल. पण विचार संपले काय साहेब ? ज्या विचारांच्या आधारावर आपण राजकारणात आलात तो विचार आता नक्कीच बदललेला आहे. त्यामुळे आपल्याला सुध्दा एक पुर्व तयारी करावी लागेल आणि भारतीय जनता पार्टीच्या कसोटीवर खरे उतरावे लागेल.

आपल्या नवीन प्रवासाला शुभकामना देतांना आम्ही 2012 मध्ये आपल्यासाठी लिहिलेले सम्राट होण्याचे वाक्य यावर आम्ही आजही कायम आहोत. आपण सम्राट व्हा.. नांदेड जिल्ह्याच्या जनतेचे भले करा आणि त्यांना जास्तीत जास्त काय देता येईल यासाठी प्रयत्न करा. पण आपल्या काही समर्थकांनी सांगितलेल्या वाक्यावरून आम्ही या लिखाणाला पुर्ण विराम देतांना खुदा हाफीज प्रिन्स असेच म्हणणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *