पालकांनो आपल्या लेकरांना सुद्धा पोलिसांनीच सांभाळायचे काय ?

नांदेड,(प्रतिनिधी)- पालकांनो आपल्या लेकरांना सांभाळण्याची जबाबदारी आपण पोलिसांकडून किती दिवस ठेवणार आहात.जन्म आपण दिला आणि ती लेकरे चुकीच्या मार्गाला जाणार असतील तर त्यांचा संभाळ पोलिसांनी करायचा काय ? नांदेड शहरातील वजिराबाद पोलिसांनी अश्याच एका भरकटलेल्या अल्पवयीन बालिकेला आपल्या संरक्षणात ठेवले आहे.पालक मंडळींनी आता तरी गांभीर्याने घेण्याची नक्कीच गरज आहे.कारण झाले ते झाले शिल्लक राहिलेलेच आपल्यासाठी खास आहे,असा विचार समाजाने करण्याची गरज आहे.

पोलिसांनी काय काय करावे याबद्दल समाजाचा असा विचार आजच्या परिस्थितीत अत्यंत मोठा विषय आहे.खरेतर आजही पोलीस आप आपल्या हद्दीतील जनतेच्या प्रत्येक घरी बाळाचे नामकरण कार्य्रक्रमात यावेत, जन्मदिन साजरा करण्यासाठी यावेत आणि अंतिम क्रियेला पण उपस्थित राहावेत अशी अपेक्षा तयार झाली आहे. पण हे सत्यात येणार आहे काय ? याचे खरे उत्तर नाही असेच आहे.काही पोलीस तर खऱ्या घटनांना चुकीच्या घटना सिद्ध करण्यात आपली धन्यता मानतात.आलेली दखलपात्र तक्रार अदखलपात्र करण्यासाठी आपले कसब वापरतात.असो आपल्या घरातील लेकरांमध्ये सुद्धा अनेक विचार,वागणूक आपण पाहतच आलो आहोत.अश्याच प्रकारे पोलीस विभागातील काही मंडळी आपण या समाजात जन्म घेतला आहे तेव्हा या समाजाची सेवा करणे आपले कर्तव्य आणि जबाबदारी असल्याचे मान्य करूनच कर्म करत आहेत. अनेक पोलिसांनी केलेल्या कार्यामुळे अनेकांचे राख रांगोळी होण्याच्या मार्गावरील जीवन पुन्हा एकदा सरळ झाले.आज ती मंडळी आनंदाने जगत आहेत.असाच एक समाजसेवाच क्षण आम्ही आमच्या लेखणीतून शब्द बद्ध केला नाही तर आम्ही सुद्धा जीवन जगण्यापेक्षा जीवन कापत आहोत असाच होईल.

काल दिनांक १७ जुलै २०२२ सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे वजिराबाद येथे अशी माहिती प्राप्त झाली की,बस स्थानकात एक अल्पवयीन बालिका सकाळ पासून बसलेली दिसत आहे.त्याच्यावर समाजातील गिधाडांची नजर लागली आहे.ती गिधाडे आपले इप्सित साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत.पोलीस पथक सहज भावनेने त्या बालिकेला आणण्यासाठी बस स्थानकात गेले.पण ती बालिका काहीच बोलत नव्हती.तेव्हा गेलेल्या पोलिसांनी हा प्रकार पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांना सांगितला. तेव्हा भंडरवार यांनी पोलीस उप निरीक्षक प्रवीण आगलावे,पोलीस अंमलदार धोंडीराम केंद्रे,संतोष बनसोडे आणि मीनाक्षी हसरगोंडे यांना तिकडे पाठवले आणि त्या बालिकेला पोलीस ठाण्यात घेऊन येण्यास सांगितले.जगदीश भंडरवार काल रविवारी साप्ताहिक सुट्टीवर होते. तरीही घडलेला प्रकार आणि त्यातील भयंकर दाहकता त्यांनी ओळखली होती.म्हणूनच आपल्या सुट्टी पेक्षा आपली जवाबदारी जास्त महत्वाची असल्याचे त्यांनी जाणले होते.

बस स्थानकात गेलेल्या पोलीस पथकाने त्या बालिकेला वजिराबाद पोलीस ठाण्यात आणण्या अगोदर तिला भोजन दिले.प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्या बालिकेचा वेध घेणारी गिधाडे समाजात मोठ्ण्या तोऱ्यात वागणारी होती.अनेक मोठ्या मोठ्या मंडळींची आमची जवळीक आहे असे दाखवणारी ती गिधाडे मात्र पोलिसांच्या आगमनाने बस स्थानकातून पाय काढती झाली.पोलीस उप निरीक्षक प्रवीण आगलावे यांनी काही दिवसांअगोदर असाच एक युवक सामाजिक स्थळाच्या आहारी जाऊन गंडवल्या गेल्यानंतर आत्महत्या करण्यासाठी नांदेडला आला होता.त्याचेही रक्षण केले होते. आज सापडलेली ते अल्पवयीन बालिका होती.तेव्हा प्रवीण आगलावे यांनी जास्त दक्षता घेतली. विचारपूस केली तेव्हा ती बालिका सांगत असलेल्या माहितीवर पोलिसांचा विश्वास बसतच नव्हता. पण खरा पोलीस बोलायला लावणार नाही तर तो पोलिसच कसला आणि अखेर ती बालिका बोलायला लागली.तेव्हा मात्र पोलिसांच्या पायाखालची जमीनच हादरली.

हि अल्पवयीन बालिका भंडारा जिल्ह्यातील रहिवाशी आहे ती बीएस्सी प्रथमवर्षाची विद्यार्थिनी आहे.इंस्टाग्रामवर एका वीरने तिला बनवले होते आणि हिझारा त्याला शोधण्यासाठी नांदेडला आली.ती अजून कोठे जाणार नव्हतीच कारण ती सकाळ पासूनच नांदेडच्या बस स्थानकावर बसलेली होती.पण या झाराचा वीर काही आलाच नाही.पोलिसांनी तिला भोजन करायला लावले म्हणजे तिच्या जवळ पैसे सुद्धा नव्हतेच.पालकांनो आपली लेकरे आजच्या एनरॉईड फोनच्या काळात त्याचा काय उपयोग करीत आहेत याचे लक्ष ठेवा.त्या बालिकेचा पेहराव पण समाजातील गिधाडांच्या आकर्षणाचा विषय होता असे लिहिले तर महिलांना राग येण्याची शक्यता सुद्धा आहेच.तरीही आम्ही ती परिस्थिती दाखवण्यासाठी लिहीत आहोत.सत्य मांडणे हेच आमचे खरे काम आहे. सत्यासाठी आम्हाला अनेकदा जीवनात खूप त्रास सुद्धा भोगावा लागला आहे तरीही सत्य सोडण्याची आमची कधीच इच्छा नव्हती,आजहि नाही आणि भविष्यात सुद्धा राहणार नाही.

नांदेड पोलिसांनी जाणून घेतलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे अड्याळ जिल्हा भंडारा येथे या बालिकेला पळवल्या प्रकरणी गुन्हा क्रमांक १५५/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ प्रमाणे दाखल आहे.नांदेड पोलिसांनी अड्याळ पोलिसांना हि बालिका सापडल्याची माहिती दिली आहे.आज ते येतील आणि बालिकेला घेऊन सुद्धा जातील.पण हा समाजाचा प्रश्न संपणार नाही.या घटनेला वाचून,समजून,करण्याची गरज आहे. काय करणार हा विचार येत असेल तर वाचकांनी आपली जबाबदारी काय आहे हे समजून घेतले तर आमची मेहनत एक कर्तब ठरेल नाहीतर अपघात.

दिवसभर बस स्थानकावर बसून असलेली बालिका समाजातील उत्कृष्ठ व्यक्तीला का दिसली नाही? समाजातील पांढरपेशा गिधाडांच्या नजरेला कशी पडली हा मुद्दा मांडताना आम्हाला असे जरूर म्हणायचे आहे की,डोळयांच्या पलीकडील जग पाहता आले पाहिजे तरच ही बालिका चांगल्या माणसांना दिसली असती आणि रात्र होण्याची वेळ आली नसती.काय केले असते हो समाजाने जर या बालिकेच्या जीवनात अंधार दाटला असता तर ? असो आता तरी पालकांनी आणि समाजातील त्या व्यक्तींनी जरूर याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्यांना समाजाप्रती खऱ्या अर्थाने प्रेम आहे.नाहीतर एक म्हण प्रसिद्ध आहे की,’व्यासपीठावर दिलेले भाषण प्रत्यक्षात आणण्यासाठी नसतेच’ या जगातील जी कोणी महान शक्ती आहे ती शक्ती या बालिकेला आपले भविष्य उज्वल  करण्याची शक्ती प्रदान करो या शब्दांसह समाजाला धन्यवाद !

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *