नांदेड, दि.५ (प्रतिनिधी)-लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खा.मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी नायगांव येथे भेट देवून नांदेडचे दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. वसंतरावजी के कार्य को हमेशा याद किया जायेगा, दुःख की इस घडी में काँग्रेस पार्टी आपके साथ है या शब्दात राहुल गांधी यांनी दाखवलेल्या आत्मीय जिव्हाळ्याने चव्हाण कुटुंबीय भारावून गेले.
नांदेड लोकसभेचे खा.वसंतराव चव्हाण यांचे २६ ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले होते. याच अनुषंगाने लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी नायगांव येथील घरी येवून दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी सुंदरताई चव्हाण, प्रा.रवींद्र चव्हाण, रंजीत चव्हाण, विजय चव्हाण व सर्व चव्हाण कुटुंबियांशी संवाद साधत आम्ही आपल्या पाठीशी असल्याचे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही आपुलकीने विचारपूस केली. कठीण समय में काँग्रेस की विचारधारा को वसंतरावजीने मजबूत करने का काम किया, अशी गौरवपूर्ण भावना गांधी व खरगे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी काँगेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना खासदार नागेश पाटील आष्टीकर, आ.अमित देशमुख, आ.मोहन हंबर्डे, माजी आ.हणमंत बेटमोगरेकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे, जिल्हाप्रमुख बबन बारसे, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय बेळगे, नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय चव्हाण, सय्यद रहीम, संभाजी भिलवंडे, दत्ता येवते, बालाजी शिंदे, माणिक चव्हाण, दिलीप पांढरे आदींची उपस्थिती होती.
…. अन राहुल गांधी गहिवरले !
नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे काय होईल अशी बिकट परिस्थिती असतांना वसंतराव चव्हाण यांनी लोकसभेला दंड थोपटले व भाजपाला चारी मुंड्या चीत करून प्रचंड विजय मिळवला. दुर्दैवाने अल्पकाळात खा.वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले. खा.राहुल गांधीनी चव्हाण कुटुंबाशी बोलतांना या घडामोडीचा ओझरता उल्लेख केला. इस क्षेत्र की जनता वसंतरावजी का योगदान नहीं भुलेगी, उन्होने आखरी वक्त तक काँग्रेस की विचारधारा को बढाया, अशी सदगदीत भावना व्यक्त करतांना राहुल गांधीना गहिवरून आले. याक्षणी चव्हाण कुटुंबीय सुद्धा भावाविवश झाले होते.