नांदेड(प्रतिनिधी)-मागील काही दिवसांपासून पक्षाच्या बैठका आणि लोकसभेच्या अधिवेशनामुळे खा.वसंत चव्हाण यांना अधिकची दगदग झाल्याने त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवत होता. यामुळे नांदेड येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेवून त्यांना तात्काळ एअर ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून हैद्राबाद येथे नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
खा.वसंत चव्हाण यांना दि.13 ऑगस्ट रोजी दुपारी अचानक प्रकृती खालावल्याने व त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. तात्काळ त्यांनी नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल होवून प्राथमिक उपचार घेतला व पुढील उपचारासाठी त्यांना हैद्राबाद येथे हलविण्यात आले. मात्र त्यांची प्रकृतीस्थिर असल्याची माहिती देण्यात आली. मागील काही दिवसांपासून पक्षाच्या बैठका आणि लोकसभेचे अधिवेशन यामुळे खा.चव्हाण यांना अधिकचा प्रवास करावा लागला. या प्रवासाच्या दगदगीतून त्यांना तब्येतीचा त्रास सुरू झाल्याची माहिती देण्यात आली. याचबरोबर त्यांचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही वाढल्या होत्या.
खा.चव्हाण यांचा वाढदिवसानिमित्त सर्व आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये त्यांच्या नायगाव विधानसभा मतदार संघात विविध कार्यक्रमांचे आयोज करण्यात आले होते. याचबरोबर नांदेड लोकसभा मतदार संघातही अनेक ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नायगाव येथे किर्तन आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातही विविध ठिकाणी खा.चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम आता रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
खा.चव्हाण यांची माहिती मिळताच अनेक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती.