नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाजेगावजवळ एका नाल्याशेजारी सुरू असलेल्या मोकळ्या जागेतील जुगार अड्ड्यावर छापा मारुन 1 लाख 46 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात 13 जुगाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी पण नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सुरू असलेल्या माळटेकडी जवळच्या जुगार अड्ड्यावर मात्र छापा पडलेला नाही. त्या जुगार अड्डयाचे वाहन तळ उड्डाणपुलाच्या खाली आहे.
पोलीस अंमलदार जमीर शफी अहेमद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी आणि त्यांच्या पथकाने 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता वाजेगाव येथील नाल्याजवळ छापा टाकला तेथे करण आनंदराव तारु (26), करण बाबुराव जाधव (21), सय्यद अरफाज सय्यद हुसेन(24), सय्यद अफसर सय्यद रजाक(34), बालाजी धोंडीबा गाडे (29), सोनाजी दिगंबर सुर्यवंशी(30),केशव नागोराव सुर्यवंशी(28), शिवकांत पांडूरंग भंडरवार(36), दिगंबर संभाजी जाधव(44), राजू शेट्ट्या पवार(23), शेख अफरोज शेख नजीर (20), शहिनशाह मोईन पठाण(20), अबु अजीम अब्दुल वासिम(27) असे 13 जुगार भेटले. हे सर्व जुगार 52 पत्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत होते. या जुगाऱ्यांकडून 9740 रुपये रोख रक्कम, काही वाहने आणि मोबाईल असा एकूण 1 लाख 46 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या लोकांविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा क्रमांक 717/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार मोरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
माळटेकडीच्या जुगार अड्ड्याचे काय?
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतच माळटेकडी हा भाग येतो. या ठिकाणी एक उड्डाण पुल आहे. त्या उड्डाणपुलाखाली जुगारी आपले वाहन तळ करतात आणि जवळच असलेल्या पत्राच्या शेडमध्ये जुगाराचा मोठा अड्डा सुरू असतो.हा अड्डा मात्र नांदेड ग्रामीण पोलीसांना दिसला नाही की, या जुगार अड्याचा सुट आहे हा विषय संशोधनाचा आहे.