नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड रेल्वे स्थानकाला जाणाऱ्या रस्त्याची अवस्था एवढी वाईट आहे की, त्यावर महानगरपालिकेचा अंधार वजिराबाद पोलीसांनी आपल्या स्वत:च्या खर्चाने उजेड पाडला आहे.
छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्यापासून ते रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता एवढ्या वाईट अवस्थेत आहे की, त्याच्या अवस्था लिहिण्याइतपत सुध्दा त्या रस्त्याची स्थिती राहिलेली नाही. रस्ता ज्या पध्दतीत आहे त्यावर वाहने चालविणे तर सोडाच पण पायी चालणे सुध्दा अवघड आहे. दुसरे म्हणजे या रस्त्यावरील सर्व पथ दिवे जे चालू ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे ते सर्व बंद आहेत.यामुळे चुकीचे काम करणारी मंडळी, गर्दुले यांच्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना होणारा त्रास हा सुध्दा अवर्णनिय आहे. पण आपली जबाबदारी कोणीच अधिकारी स्विकारत नसतात हे या लोकशाहीतील सत्य आहे.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांनी मात्र एक विचार केला. की, काही घटना, दुर्घटना घडली तर त्यासाठी शासकीय कागदपत्रे बनविणे, पिडीत व्यक्तीला मदत करणे ही जबाबदारी तर पलीच आहे. तेंव्हा त्यांनी महानगरपालिकेने केलेला अंधार आपल्या पोलीसांकडून वर्गणी उभी करून त्या रस्त्यावर मोठ-मोठे हॅलोजन बल्ब लावले आहेत. या दिव्यांना विद्युत मात्र या रस्त्यावर असलेल्या व्यापाऱ्यांनी दिलेली आहे. सोबतच काही व्यापाऱ्यांचे सीसीटीव्ही वजिराबाद पोलीसांनी बदलून रस्ता चांगला दिसेल अशा पध्दतीने लावण्याची विनंती त्यांना केली आहे आणि ती विनंती व्यापाऱ्यांनी मान्य केली आहे. फक्त आपल्याकडे येणाऱ्या लोकांचा विचार न करता सर्वसामान्य नागरीकाचा विचार करत वजिराबाद पोलीसांनी केलेले हे काम प्रशंसनिय आहे.