नांदेड जिल्हयातील उद्योजकांसाठी मैत्रीच्या माध्यमातून सुवर्णसंधी

 

 

नांदेड, दि. 22 जुलै :- उद्योग संचालनालयातंर्गत जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड, सिडबी व मैत्री तर्फे नांदेड जिल्हयातील उद्योजकांसाठी, उद्योग क्षेत्रातील कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, जिल्हयात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक स्वरुपात वाढवून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्याप्रमाणात निर्माण करण्यासाठी, उद्योगाच्या विकासाकरिता शासनाच्या विविध योजनांच्या माहितीसाठी आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे अध्यक्षतेखाली, उद्योग भवन कार्यालय जिल्हा उद्योग केंद्र, शिवाजीनगर, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न झाली.

 

मान्यवरांना एक जिल्हा एक उत्पादनातंर्गत उत्पादित वस्तूंचे सस्नेह भेट सुपुर्द करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये उद्योगाशी संबंधीत विविध कार्यालयाचे तसेच महामंडळाचे पदाधिकारी, अग्रणी बँक अधिकारी उपस्थित होते. जिल्हयातील औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी, नामांकित उद्योजक, औद्योगिक समुह, सनदी लेखापाल व होतकरु उद्योजक इत्यादीची उपस्थिती होती. या कार्यशाळेतील प्रास्ताविकात, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी उद्योजकांना उद्योग स्थापनेसाठी विहीत वेळेत परवाने मिळून देण्यास, उद्योजकांच्या अडी-अडचणी दूर होण्यास मैत्री या माध्यमाची उपयुक्तता विषद करुन राज्य शासनाच्या विविध योजनांची फलश्रुतीही सांगितली.

 

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये, उद्योजकांना शासनाचे वित्तीय पाठबळ आहे, एक खिडकी योजनेतंर्गत उद्योजकांना परवानग्या तसेच सुविधेसाठी मैत्री कक्ष कार्यरत आहे. समाजाच्या उत्कर्षासाठी, देशात उद्योजकांची नवी पिढी तयार करावयाची आहे. त्यासाठी तरुण/तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता, रोजगार व स्वयंरोजगार निर्मीतीसाठी समुह विकासाचा मार्ग अवलंबून तसेच प्रामाणिक हेतू ठेवून वित्तीय संस्थेचे आर्थिक सहाय्यभूत मदत घेवून उद्योजक बना असे त्यानी सांगितले.

 

या कार्यशाळेस पद्माकर हजारे, नोडल ऑफिसर, मैत्री कक्ष, मुंबई यांनी सादरीकरणातून मैत्री कक्षाची कार्यरचना विशद केली. श्रीमती क्षितीजा बलखंडे, सहाय्यक प्रबंधक, सिडबी यांनी उद्योजकांना सहाय्यभूत सिडबीच्या विविध योजनांची माहिती खुमासदारपणे विषद केली. व्ही. यु. कुलकर्णी यांनी डाक विभागाच्या योजनांची माहिती कार्यशाळेस दिली. तसेच अनिल जाधव यांनी विमासंदर्भात माहिती सादर केली. सतिश चव्हाण, उद्योग निरीक्षक यांनी कार्यशाळेच्या सरतेशेवटी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची विशेषत: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची माहिती सादर करुन, उपस्थितांचे आभार व्यक्त करत कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!