नांदेड (प्रतिनिधी)- सन 2023 मध्ये घडलेल्या एका खुन प्रकरणातील संस्थेचे अध्यक्ष यांना अटक झाल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.डी. माने यांनी त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात दोन शिक्षकांविरूद्ध अगोदरच दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यात आले आहे आणि ते सत्र न्यायालयाकडे वर्ग झालेले आहे. पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात सुद्धा अटकपूर्व जामीन मागितला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांकडे हजर होण्यास सांगितले. या प्रकरणात एक वकील साहेब सुद्धा आरोपी आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार उत्तमराव नागोराव शिंदे वय 62, रा. मनाठा ता. हदगाव यांना दि. 2 जून 2023 रोजी अत्यंत भल्या पहाटे 5 ते 5.30 वाजेदरम्यान मनाठा ते मनाठा पाटी जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर बोलाविले. या रस्त्यावर त्यांना चारचाकी गाडी क्र. एम.एच. 26 बी.क्यू. 7114 या गाडीने धडक देऊन त्यांचा खून केला. मयत उत्तमराव नागोराव शिंदेंचे पूत्र विशाल उत्तमराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांच्या वडिलांच्या खून करण्यामध्ये अमोल मारोतराव शिंदे वय 37 आणि तयांचे बंधू सुहास मारोतराव शिंदे वय 40 हे दोन शिक्षक तसेच आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारोतराव नागोराव शिंदे वय 73 आणि त्यांचे पूत्र ऍड. संदीप मारोतराव शिंदे वय 36 यांचे नाव आरोपी या सदरात होते. या प्रकरणी मनाठा पोलिसांनी चार जणांविरूद्ध गुन्हा क्र.61/2023 भारतीय दंड संहितेचे कलम 302, 120 ब, 201, 324 नुसार दाखल करण्यात आला. हा खुनाचा प्रकार गावातील आदर्श शिक्षण संस्था मनाठा येथील अध्यक्षपद आणि गावातील इतर विविध पदांच्या वादातून घडला होता.
मनाठा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी अमोल शिंदे यांना 28 ऑगस्ट 2023 रोजी अटक केली आणि सुहास शिंदे यांना 6 डिसेंबर 2023 रोजी अटक केली. त्यांच्याविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले, तेव्हा आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारोतराव नागोराव शिंदे आणि त्यांचे पूत्र संदीप मारोतराव शिंदे यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 299 प्रमाणे फरार आरोपी दाखविण्यात आले होते. या गुन्ह्याला घडून एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. या दरम्यान अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या देखील उंबरठे झिजवणयात आले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मनाठा पोलिसांसमोर हजर होण्यास सांगितले. त्यानुसार 20 जुलै 2024 रोजी मनाठाचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी मारोतराव शिंदेला अटक केली.
आज मारोतराव शिंदे यांना हदगाव न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी वकील ऍड. गिरीष मोरे यांनी आणि सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी न्यायालयात या प्रकरणाच्या तपासातील प्रगतीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. न्यायाधीश आर.डी. माने यांनी मारोतराव नागोराव शिंदे यांना दोन दिवस अर्थात 23 जुलै 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.