नांदेड(प्रतिनिधी)-भोकर शहरात प्रत्यक्ष एटीएम फोडून त्यातील रक्कम चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरांपैकी एकाला जनतेतील लोकांनी पकडून पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर चोरट्याविरुध्द चोरी करण्याचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल केला आहे. चोरी करतांना चोरट्यांनी एटीएम मशीनचे 1 लाख रुपयांचे नुकसान केले आहे.
भोकर शहरात बस स्थानक रस्त्यावर सुलोचना ढोले यांचे व्यापारी संकुल आहे. त्यातील एका गाळ्यात इंडिया-1 कंपनीचे एटीएम सेंटर आहे. दि.19 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास एक व्यक्ती त्या एटीएममध्ये बसून स्कु्र ड्रायव्हरच्या सहाय्याने एटीएम मशीन उघडत होता. व्यापारी संकुलाचे मालक आनंद ढोले हे त्यावेळी घरातून बाहेर आले आणि त्यांनी एटीएममध्ये काही तरी सुरू आहे हे पाहिले. मध्ये बसलेला व्यक्ती एटीएमचे ड्राव्हर उघडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे नाव विचारले असता तो सोमेश नामदेव राठोड (26) रा.वसंतनगर तांडा गोरठा ता.उमरी जि.नांदेड हा युवक होता. आनंद ढोले आणि इतरांनी त्याला पकडून ठेवले आणि याची माहिती पोलीसांना दिली.
भोकरचे ोलीस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड आणि इतर अधिकारी पोहचले. आनंद माधवराव ढोले यांच्या तक्रारीवरुन भोकर पोलीसांनी चोरी करण्याचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार नामदेव जाधव हे करीत आहेत. या चोरी प्रकरणात चोरट्यांनी मुख्य दाराचे काच फोडले, एटीएम मशीनचे झालेले नुकसान आदींचा हिशोब लावला तर 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.