नांदेड(प्रतिनिधी)-येथील कै.डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रुग्णालयाच्या इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागली असून तर काही ठिकाणचा रंगही उडून गेला आहे. तसेच या ठिकाणच्या स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नांदेड शहराध्यक्ष जीवन घोगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. या मागणीच्या आधारावरच नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात 21 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला महम्मद खालीद नवाज, विलास गजभारे, प्रविण घुले आदीजण उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नांदेड शहराध्यक्ष जीवन घोगरे यांनी पत्रकारांना माहिती देतांना म्हणाले की, या ठिकाणी विष्णुपूरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. या ठिकाणी नांदेडसह लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ व शेजारील तेलंगणा आणि कर्नाटका राज्यातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेण्यााठी येतात. या ठिकाणी जवळपास 1200 च्या बाह्य रुग्णाची तपासणी दररोज होते. या इमारतीच्या दुरूस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता होती. 24 तासात 24 रुग्ण दगावल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. यानिमित्ताने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ नांदेड येथे आले असतांना रुग्णालयाची सविस्तर माहिती सांगितली आणि या ठिकाणच्या देखभाल दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली. यामध्ये अंतर रुग्ण विभागाची गळती काढणे व रंग काम करणे यासाठी 9 कोटी 92 लाख 20 हजार रुपये, बाह्य रुग्ण विभागाची गळती काढणे व रंग काम करणे यासाठी 4 कोटी 36 लाख 73 हजार रुपये, शस्त्रक्रियागृह विभागाची गळती काढणे व रंग काम करणे यासाठी 3 कोटी 42 लाख 33 रुपये आणि अपघात विभाग व केंद्रीय नोंदणी विभागाची गळती काढणे आणि रंग काम करणे यासाठी 3 कोटी 98 लाख 4 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी जीवन घोगरे यांनी 28 डिसेंबर 2023 रोजी केली होती. राज्याच्या अर्थसंकल्पात 21 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यासाठी मी आणि स्थानिक आमदार मोहन हंबर्डे यांनी पाठपुरावा केला होता. ज्याच काही या मतदार संघात काम नाही अशा जिल्हाध्यक्ष इंजि.विश्र्वंभर पवार यांनी फुकटच श्रेय घेवू नये त्यांनी त्यांच्या भोकर मतदार संघासाठी 5 कोटींचा तर निधी आणून दाखवावा. इतरांच्या मतदार संघात लुडबुड करणे थांबवावा असा सल्ला राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नांदेड शहराध्यक्ष जीवन घोगरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.