नांदेड(प्रतिनिधी)-इतर पंतसंस्थेपेक्षा जास्त व्याजदर देतो असे आमिष दाखवून राजस्थानी मल्टीस्टेट को.ऑ.के्रडीट सोसायटी लि.शाखा नांदेड यांनी 86 लाख 33 हजार 828 रुपयांची 14 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांसह 27 जणांविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल आहे.
सुधीर नागोराव देशमुख रा.सराफा होळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरूकृपा मार्केट महाविर चौक येथे असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट को.ऑ.के्रडीट सोसायटी लि.शाखा नांदेड यांनी इतर के्रडीट सोसायटींपेक्षा जास्त फायदा देतो असे आमिष दाखवून सुधीर देशमुख व इतर 13 जणांकडून ठेवी घेतल्या. सुधीर देशमुख यांनी 5 लाख रुपयांची ठेव तेथे ठेवली होती. त्याचे व्याज 24 हजार रुपये असे 5 लाख 24 हजार त्यांना परत दिले नाही.तसेच इतर 13 लोकांकडून घेतलेल्या एकूण ठेवींची रक्कम 86 लाख 33 हजार 828 रुपये होते. ती ठेवीतील रक्कम व व्याज मुदतीत लोकांना परत न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन के्रडीट सोसायटीमधील अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केली आहे.
सुधीर देशमुख यांच्या फिर्यादीनुसार या क्रेडीट संस्थेचे अध्यक्ष चंदुलाल मोहनलाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव ब्रदीनारायण बाहेती, सहसचिव प्रल्हाद अग्रवाल, कोषाध्यक्ष विजय लड्डा, संचालक अशोक जाजू, सतिश सारडा, अजय पुजारी, सौ.प्रेमलता बाहेती, सौ.कल्पना बियाणी, नामदेवराव रोडे, कार्यकारी संचालक जगदीश बियाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुलकर्णी, शाखा व्यवस्थापक जयवंत बालाजी चौधरी, स्थानिक सल्लागार गोवर्धन सारडा, डॉ.संजय करवा, डॉ.सतिश लटुरिया, विठ्ठलदास लोया, राजेेंद्रकुमार मालपाणी, कमल कोठारी, प्रविण तोष्णीवाल, धीरज तोष्णीवाल, कैलास झंवर, ऍड.अनिकेत भक्कड, किरणप्रकाश तोष्णीवाल, ऍड. आनंद बंग अशा 26 नावांसह बॅंकेचे कर्मचारी असे शब्द तक्रारीत लिहिलेले आहेत.
वजिराबाद पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 409, 420, 34 सोबत महाराष्ट्र ठेवीदाराचे संरक्षण अधिनियम 1999 प्रमाणे गुन्हा क्रमांक 288/2024 दाखल केला असून या प्रकरणाचा तपास वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम हे करीत आहेत.