बिलोली(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे बिलोलीच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन, 13 वर्षाच्या बालिकेला 31 मे रोजी पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिला नांदेड-हैद्राबाद रस्त्यावरील एका गावाजवळ सोडून पळून गेलेल्या तीन जणांना बिलोली पोलीसांनी अटक केल्यानंतर बिलोली न्यायालयाने त्या तिघांना तिन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक 13 वर्षीय अल्पवयीन बालिका हनंमत माधव बनकर(20) याने पळवून नेले. याबाबत त्या 13 वर्षीय बालिकेच्या आईने 1 जून रोजी तक्रार दिली, त्या संदर्भाने बिलोली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 363, 366(अ) नुसार गुन्हा क्रमांक 85/2024 दाखल झाला. बिलोलीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक बी.एम.नरवटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक डी.बी.मुंडे यांच्याकडे तपास देण्यात आला.
या बालिकेचा शोध घेत असतांना अशी माहिती समोर आली की, बालिकेला पळवणाऱ्या हनमंत बनकरसह तिच्यावर अनेक जणांनी अत्याचार केला. ती बालिका अगोदर नांदेड-हैद्राबाद रोडवर असणाऱ्या गावात आपल्या बहिणीकडे गेली. तिने बहिणीला सर्व घडलेला प्रकार सांगितला त्यांतर त्याा बालिकेने बिलोली पोलीस ठाण्यात आपला स्वत:चा जबाब नोंदवला. अल्पवयीन बालिका 13 वर्षांचीच असल्याने सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून पोलीसांनी गुन्ह्यात पोक्सो कायद्याची कलमे वाढवली. पालिकेने सांगितलेल्या नावांप्रमाणे हनमंत माधव बनकर (20), प्रविण लक्ष्मण येरू (34) संदेश हिरावत पवार(25) या तिन जणांना अटक केली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार 13 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यांची संख्या 6 आहे.
पकडलेल्या तिघांना बिलोली पोलीसांनी न्यायालयात हजर करून तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती केली आहे. न्यायालयाने पोलीसांची विनंती मान्य करत बालिकेवर अत्याचार करणाऱ्या तिघांना तिन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.