नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणून स्थानिक गुन्हा शाखेने 1 लाख 38 हजार रुपयांचा चोरीतील ऐवज जप्त केला आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेला प्राप्त झालेल्या माहितीनुसार 4 जून रोजी त्यांनी मिल्लतनगर भागातून शेख नदीम शेख शमशोद्दीन यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हा क्रमांक 452/2024 मधील चोरी केल्याची कबुली दिली. हा गुन्हा 28 मे ते 1 जून दरम्यान मिल्लतनगर भागातील सय्यद जावेद सय्यद अहेमद यांच्या घरी घडला होता. या काही दिवसांमध्ये ते मुंबईला गेले होते. त्या चोरीमध्ये सोन्याचे एक नेकलेस 22 ग्रॅम वजनाचे, 1 लाख रुपये किंमतीची, सोन्याची एक अंगठी 4.5 ग्रॅम वजानाची, 20 हजार रुपये किंमतीची तसेच 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 35 हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेने त्याच्याकडून त्या चोरीमधील एक सोन्याचे नेकल्से 22.80 ग्रॅम वजनाचे आणि रोख 15 हजार रुपये असा एकूण 1 लाख 38 हजार रुपयांचा चोरीतील ऐवज जप्त केला आहे. पुढील तपासासाठी शेख नदीम शेख शमशोद्दीनला नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांनी या कामगिरीसाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार संजीव जिंकलवाड, विठ्ठल शेळके, बालाजी यादगिरवाड, मोतीराम पवार, शेख कलीम यांचे कौतुक केले आहे.