शासनाचे मार्गदर्शन मिळेपर्यंत कार्यकारी बैठका आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मनाई

नांदेड (प्रतिनिधी) – श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या पुनर्स्थापनेनंतर बोर्डाच्या कामकाजासंदर्भात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे बोर्डाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेला तूर्तास ब्रेक लागला आहे. शासनाकडून याबाबत अधिकृत मार्गदर्शन प्राप्त होईपर्यंत कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.

शासनाच्या २६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार गुरुद्वारा सचखंड बोर्डाची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. मात्र, पुनर्स्थापित बोर्डाच्या कामकाजाच्या अनुषंगाने अध्यक्ष पदाबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनाकडे पत्र पाठवून मार्गदर्शन मागविले आहे.

ही बाब सध्या शासनस्तरावर विचाराधीन असल्याने शासनाचे मार्गदर्शन प्राप्त होईपर्यंत गुरुद्वारा सचखंड बोर्डाने धोरणात्मक कामकाजासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच बोर्डाच्या कार्यकारी बैठका आयोजित करणे, प्रशासकीय स्वरूपाचे महत्त्वपूर्ण निर्णय घेणे अथवा बोर्डाच्या कार्यपद्धतीवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही विषयावर निर्णय घेण्याची कार्यवाही करू नये, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

२८ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्मादाय शाखेमार्फत गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या अधीक्षकांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत कळविण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या आदेशामुळे गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या आगामी कामकाजाबाबत आता शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!