महार-मांग जातीतील अंतर्गत संघर्ष : एक ऐतिहासिक दस्तावेज पुस्तकाचे संविधान दिनी प्रकाशन; मान्यवरांनी मांडली सामाजिक एकतेची भूमिका

नांदेड (प्रतिनिधी) –  महार-मांग समाजातील अंतर्गत संघर्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक ऐक्याविषयीचे विचार आणि अनुसूचित जातींच्या एकजुटीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या महार-मांग जातीतील अंतर्गत संघर्ष : एक ऐतिहासिक दस्तावेज या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त नांदेड येथे उत्साहात पार पडले. डॉ. राजू मधुकर सोनसळे आणि कपिल कांतराव सरोदे यांनी या पुस्तकाचे संकलन व संपादन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे होते. यावेळी भदंत पय्याबोधी थेरो, मास मूव्हमेंटचे प्रतीक मोरे, डॉ. श्रीहरी कांबळे, सुभाषदादा काटकांबळे, नंदकुमार बनसोडे, सुखदेव चिखलीकर, राहुल सोनसळे, माधव चित्ते यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, अभ्यासक आणि पत्रकार उपस्थित होते.

प्रकाशक रामप्रसाद खंडेलवाल यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत महार-मांग समाजातील ऐतिहासिक संबंध आणि सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. बाबासाहेबांनी महार-मांग परिषदांच्या माध्यमातून विविध समाजघटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मातंग समाजाला कधीही दूर लोटले नाही, तर संवाद, समजूतदारपणा आणि सामाजिक एकतेचा मार्ग स्वीकारला, असे त्यांनी सांगितले.

या पुस्तकामध्ये बाबासाहेबांच्या भाषणांमधून, पत्रव्यवहारातून आणि तत्कालीन सामाजिक परिस्थितीवरील त्यांच्या भूमिकेतून महत्त्वपूर्ण विचार मांडण्यात आले आहेत. सध्याच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर समाजात निर्माण झालेला गैरसमज आणि संघर्ष दूर करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. बाबासाहेबांचे विचार समजून घेण्यासाठी केवळ भाषणांवर अवलंबून न राहता त्यांचे लिखाण आणि पत्रव्यवहार प्रत्येकाने वाचला पाहिजे, असे आवाहन खंडेलवाल यांनी केले.

भदंत पय्याबोधी थेरो यांनी पुस्तकातील ऐतिहासिक संदर्भांचे महत्त्व विशद करताना १९४१ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देविदास कांबळे यांच्यातील पत्रव्यवहाराचा विशेष उल्लेख केला. त्या पत्रातून बाबासाहेबांची परखड भूमिका, नेतृत्वाची जबाबदारी आणि समाजातील प्रश्नांवर स्पष्टपणे मत मांडण्याची त्यांची भूमिका दिसून येते. समाजातील वंचित घटकांपर्यंत आरक्षण आणि घटनात्मक हक्कांची माहिती पोहोचली पाहिजे. केवळ पुस्तक वाचणे पुरेसे नसून त्यातील विचार समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

प्रतीक मोरे यांनी आपल्या भाषणात २०२४ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाची निर्मिती झाल्याचे सांगितले. महार-मांग समाजातील संघर्षाची चर्चा करताना १९४१ मधील ऐतिहासिक पत्रव्यवहार समोर आणणे आवश्यक होते. बाबासाहेबांनी त्या काळातही समाजातील अंतर्गत मतभेदांना सामोरे जात संवाद आणि विचारांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या पिढीने त्या इतिहासातून शिकण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

कपिल कांतराव सरोदे यांनी पुस्तक निर्मितीमागील भूमिका स्पष्ट करताना मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात महार आणि मांग समाजामध्ये संघर्षाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले. या संघर्षाला ऐतिहासिक संदर्भ असून त्याचे योग्य आकलन होणे आवश्यक आहे. १९४१ मध्ये मातंग समाजातील शिक्षित व्यक्तींनी बाबासाहेबांना पत्र लिहून काही प्रश्न उपस्थित केले होते. बाबासाहेबांनी त्या पत्राला उत्तर देताना आपली भूमिका स्पष्ट केली आणि संबंधित पत्रव्यवहार आपल्या नियतकालिकातून प्रसिद्धही केला. विरोधी मत असले तरी ते ऐकून घेण्याची आणि त्याला उत्तर देण्याची बाबासाहेबांची लोकशाहीवादी भूमिका या पुस्तकातून समोर येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. राजू सोनसळे यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या पुस्तकामध्ये महार-मांग समाजातील ऐतिहासिक मतभेद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, सामाजिक एकतेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि तत्कालीन पत्रव्यवहाराचा समावेश आहे. समाजातील संघर्षाचे मूळ समजून घेऊन भविष्यात एकजुटीने वाटचाल करण्यासाठी हा ऐतिहासिक दस्तावेज उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे यांनी आपल्या भाषणात पुस्तकाचे संकलक-संपादक डॉ. राजू सोनसळे आणि कपिल सरोदे यांच्या कार्याचे कौतुक केले. चळवळ टिकवायची असेल तर वाचनसंस्कृती वाढविणे आवश्यक आहे. केवळ मोर्चे, आंदोलने आणि भाषणांमधून परिवर्तन घडत नाही, तर वैचारिक प्रगल्भता, अभ्यास आणि कृतीतून समाजाची उभारणी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जातीच्या चौकटीत मर्यादित न ठेवता सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचार केवळ बोलण्यात नव्हे, तर प्रत्येकाच्या वर्तनात दिसले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

महार-मांग समाजातील मतभेद आणि आरक्षण उपवर्गीकरणाच्या प्रश्नावरून निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास, परस्पर संवाद आणि वैचारिक प्रगल्भता आवश्यक असल्याचा सूर यावेळी मान्यवरांच्या भाषणांतून व्यक्त झाला. समाजातील अंतर्गत संघर्षाचा फायदा इतर शक्तींना होऊ नये, यासाठी बहुजन आणि वंचित समाजघटकांनी एकत्र राहण्याची गरजही वक्त्यांनी अधोरेखित केली. संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित या पुस्तक प्रकाशन सोहळ्याने सामाजिक ऐक्य, वाचनसंस्कृती आणि बाबासाहेबांच्या मूळ विचारांच्या पुनर्वाचनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना हे पुस्तक आवर्जून वाचण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन उमेश राजभोज यांनी केले. तर आभार सुखदेव चिखलीकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!