नांदेड परिक्षेत्रात लोकाभिमुख पोलीसिंगचा नवा अध्याय; संवेदनाप्रणालीद्वारे तक्रारींच्या निवारणावर राहणार फीडबॅक टीमचा कडक पहारा हिंगोली (विशेष प्रतिनिधी) – नागरिकांच्या अडीअडचणींचे त्वरीत निवारण करत पोलीस आणि सामान्य जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष धडक मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत आयोजित जनसंवाद उपक्रमांतर्गत त्यांनी हिंगोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतः उपस्थित राहून तक्रारदारांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि ९ अर्जांवर त्वरित कार्यवाहीचे सक्त निर्देश दिले. वार्षिक व मासिक आढावा आणि जनसंवाद हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस कामगिरीचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप हे सकाळीच पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले होते. कामकाजाच्या सखोल तपासणीनंतर, दुपारी ३.०० ते ४.३० या वेळेत त्यांनी विशेष ‘जनसंवाद’ दालनात जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधला. या सुनावणी दरम्यान विविध भागांतून आलेल्या एकूण ९ तक्रारदारांनी आपले लिखित अर्ज पोलीस उप महानिरीक्षकांकडे सादर केले. तक्रारींचे स्वरूप आणि अधिकाऱ्यांना सक्त निर्देश प्राप्त अर्जांमध्ये प्रामुक्षाने मालमत्ताविषयक वाद, आपापसातील मारहाणीचे प्रकार, दाखल गुन्ह्यांच्या तपासातील विलंब तसेच परिसरातील अवैध व्यवसायांसंदर्भातील तक्रारींचा समावेश होता. या प्रत्येक अर्जाची अतिशय गांभीर्याने दखल घेत, पोलीस उप महानिरीक्षकांनी घटनास्थळीच संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना चौकशी करून त्वरित, निष्पक्ष व गतिमान उकल करण्याचे कडक निर्देश दिले. संवेदना पोर्टल आणि फीडबॅक टीमचा वॉच नागरिकांच्या तक्रारी केवळ कागदावर न राहता त्यांना न्याय मिळावा यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने यापूर्वीच संवेदना ही डिजिटल तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित केली आहे. जनसंवाद उपक्रमात प्राप्त झालेले सर्व ९ अर्ज संवेदना पोर्टलवर नोंदवून पुढील कायदेशीर चौकशीसाठी वर्ग करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या प्रत्येक अर्जावर स्थानिक अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली, याचा नियमित आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील विशेष ‘फीडबॅक टीम’ प्रत्यक्ष तक्रारदारांशी संपर्क साधून घेणार आहे. कायद्याचे राज्य आणि लोकाभिमुख कारभार या उपक्रमाच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना प्रशासनाने स्पष्ट केले की, नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर या चारही जिल्ह्यांत जनसंवाद उपक्रम राबविला जात आहे. पोलीस प्रशासनाला अधिकाधिक लोकाभिमुख बनवणे, पोलीस व नागरिकांमधील संवादातील दरी मिटवणे आणि सर्वसामान्यांना विनाविलंब न्याय मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य पाठीचा कणा आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती या जनसंवाद प्रसंगी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्री श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले तसेच शहर परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी प्रमुख उपस्थित होते. या लोकाभिमुख उपक्रमामुळे हिंगोली जिल्ह्यातील सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक द्विगुणित होत असल्याचे चित्र दिसत आहे. Kanthak Suryatal Post Views: 24 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation एस.टी. बसचालकावर हल्ला;ऑटो चालकास १६ वर्षांनंतर सश्रम कारावास