नांदेडकरांचा राज्य नाट्य स्पर्धेला चांगला प्रतिसाद आज बंड्या तुमच्या उरावर हे विनोदी प्रभोधनपर नाटक नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावरील प्राथमिक फेरीत मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी परभणी येथील राजीव गांधी युवा फोरमच्या वतीने भयरात्र या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सायंकाळी ७ वाजता झालेल्या या प्रयोगातून मृत्यूची भीती, जगण्याची इच्छा आणि मानवी मनातील संघर्ष यांचा वेध घेण्यात आला. रविशंकर झिंगारे लिखित या नाटकाचे दिग्दर्शन अनिल साळवे यांनी केले असून संकेत संजय पांडे हे निर्माते आहेत. ‘भयरात्र’ ही एका सुनसान रेल्वे स्थानकावर घडणारी एका रात्रीची कथा आहे. मध्यरात्रीच्या शांततेत दोन अनोळखी प्रवासी एकमेकांसमोर येतात. त्यांच्या संवादातून मृत्यू, भविष्य, जगण्याची इच्छा आणि सूड या विषयांचे विविध पैलू उलगडत जातात. सुडाची न संपणारी प्रक्रिया हा नाटकाचा मुख्य गाभा आहे. सूड कधीच संपत नाही, तर तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जातो, नवी रूपे घेतो आणि नव्या कारणांनी पुन्हा उभा राहतो. अपमान, अन्याय, दुखावलेपण आणि हरवलेली माणसे अशा वेगवेगळ्या कारणांतून सूडाची भावना जन्माला येते. मात्र, त्यातून निर्माण होणारे दुःख आणि वेदना पुढील संघर्षाला कारणीभूत ठरतात. या चक्रातून माणसाची सुटका होते की नव्या संघर्षाची सुरुवात होते, असा विचार नाटक मांडते. या नाटकात तो ही भूमिका प्रकाश बारबंड, वृद्ध आणि व्यक्ती ही भूमिका सौरभ कुरुंदकर, तर मित्र ही भूमिका विजय कुलकर्णी यांनी साकारली. नाटकासाठी नेपथ्य अनिल साळवे व आदित्य पांडे, प्रकाशयोजना नागेश कांबळे व श्रीकांत रेणापूरकर, रंगभूषा रेवती पांडे व रेणुका अंबेकर, वेशभूषा सरोज पांडे व अंजली कुलकर्णी यांनी केली. संगीताची जबाबदारी दिनेश नरवाडे व अनंत जोशी यांनी सांभाळली. रंगमंच व्यवस्थापन निर्मला जोशी, वेदांत बारबिंड , प्रकाश बारबिंड, काशिनाथ चंदापूरे, सतीश कुरुंदकर, स्वाती कुरुंदकर, गोविंद औसेकर व अरुण गोरेगावकर यांनी केले. भयरात्र मधून सूड, मृत्यूची भीती आणि जगण्याची तीव्र इच्छा यांचा मानवी मनावर होणारा परिणाम अधोरेखित करण्यात आला. एका रात्रीच्या कथेतून मानवी भावविश्वातील गुंतागुंत आणि सूडाच्या न संपणाऱ्या प्रवासावर भाष्य करण्याचा प्रयत्न या नाटकाने केला. आज दि. २६ नोव्हेंबर रोजी ठीक सायंकाळी ७ वा. बंड्या तुमच्या उरावर हे विनोदी नाटक सादर होणार आहे तरी नांदेडकर नाट्य रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने या नाटकांचा लाभ घेऊन नाट्य कलावंतांना प्रोत्साहित करावे असे आव्हान संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 25 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अंधारात चालणारे सरकार आणि एआय ची पाळत! खामेनेईंच्या अनुपस्थितीत इराणमध्ये सत्तापालटाचे संकेत?