गंभीर गुन्हेगारांना सवलत, पण प्रश्न विचारणाऱ्यांवर कारवाई? ध्रुव राठींच्या दाव्याने देशाच्या राजकारणात खळबळ! एकीकडे देशामध्ये अत्यंत गंभीर आणि अमानुष गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या आरोपींना न्यायालयाकडून दिलासा मिळतो, तर दुसरीकडे सरकार आणि व्यवस्थेला रोखठोक सवाल विचारणाऱ्या विचारवंतांवर व युट्युबर्सवर वर्षांनुवर्षे धुळ खात पडलेल्या जुन्या फाईल्स उघडून कारवायांचा बडगा उगारला जातो. हा निव्वळ एक कायदेशीर योगायोग आहे की विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी रचलेले एक पद्धतशीर राजकारण? हाच तापदायक प्रश्न आता प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी यांनी थेट देशाच्या न्यायव्यवस्थेसमोर आणि साकेत कोर्टाच्या कारवायांवर बोट ठेवत उपस्थित केला आहे. बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना मिळालेला जामीन आणि त्याच काळात स्वतःविरुद्ध जारी झालेले गैर-जमानती वारंट या दोन्ही घटनांची तुलना करत ध्रुव राठी यांनी न्यायव्यवस्थेच्या टायमिंगवर आणि न्यायाच्या दुहेरी मापदंडांवरच जोरदार प्रहार केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी, कायदेशीर बाजू आणि लोकशाहीवरील परिणामांचा घेतलेला हा सविस्तर आढावा. ताजी घडामोड: ध्रुव राठींविरुद्ध साकेत कोर्टाचे गैर-जमानती वारंट २३ नोव्हेंबर २०२६ रोजी दिल्लीच्या साकेत कोर्टाने ८ वर्षे जुन्या एका मानहानीच्या प्रकरणात युट्युबर ध्रुव राठी यांच्याविरोधात गैर-जमानती वारंट जारी केले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० डिसेंबर २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे.अदालती प्रक्रियेनुसार, जर एखादी व्यक्ती वारंवार समन पाठवूनही न्यायालयात उपस्थित राहत नसेल, तर न्यायमूर्तींकडून आधी जमानती आणि नंतर गैर-जमानती वारंट जारी केले जाते. मात्र, या वारंटचा अर्थ संबंधित व्यक्ती दोषी सिद्ध झाली असा होत नाही, तर ती केवळ न्यायालयात हजेरी निश्चित करण्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे. परंतु, या प्रकरणातील कोर्टाच्या अचानक वाढलेल्या वेगावर आणि टायमिंगवर आता अनेक कायदेतज्ज्ञ आणि नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रकरण काय आहे? ८ वर्षे जुना बीजेपी आयटी सेल मानहानीचा खटला हे संपूर्ण प्रकरण मे २०१८ मधील आहे. ध्रुव राठी यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर बीजेपी आयटी सेल पार्ट-२ नावाचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये राठी यांनी असा आरोप केला होता की, भाजप आयटी सेलशी संबंधित लोकांनी विकास पांडे नावाच्या व्यक्तीला लाच देण्याचा प्रयत्न केला होता. या व्हिडिओनंतर आय सपोर्ट नरेंद्र मोदी या सोशल मीडिया पेजचे संस्थापक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक विकास संकृत्यायन म्हणजेच विकास पांडे यांनी ध्रुव राठी आणि दिल्लीचे तात्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. विकास पांडे यांच्या मते, या व्हिडिओमुळे त्यांच्या प्रतिमेला मोठी हानी पोहोचली. या प्रकरणात एक महत्त्वाचा वळण म्हणजे, अरविंद केजरीवाल यांनी तो व्हिडिओ केवळ रीट्विट केला होता आणि पुढे जाऊन त्यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात माफीही मागितली होती. मात्र, मूळ व्हिडिओ बनवणाऱ्या ध्रुव राठी यांच्याविरोधात दंडाधिकारी न्यायालयात खटला सुरूच राहिला. २०१९ मध्ये राठी यांना समन पाठवण्यात आले होते, परंतु त्यानंतर अनेक वर्षे हे प्रकरण अत्यंत मंद गतीने प्रलंबित राहिले. अचानक वाढलेली गती आणि टायमिंगवर उठलेले संशय अनेक वर्षे धूळ खात पडलेल्या या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांत अचानक कमालीची वेगवान हालचाल झाली. हे प्रकरण मूळत: २० नोव्हेंबर २०२६ साठी सूचीबद्ध होते, परंतु तक्रारदाराने सुनावणी लवकर घेण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला. यानंतर कोर्टाची संपूर्ण क्रोनोलॉजी खालीलप्रमाणे वेगाने बदलली: १७ ऑक्टोबर २०२६: साकेत कोर्टाचे न्यायिक दंडाधिकारी राहुल जैन यांनी राठी यांच्याविरोधात जमानती वारंट जारी केले. कारण म्हणून सांगण्यात आले की, गुरुग्राम येथील घरावर ताटा ठोकलेला होता. मात्र, हे वारंट ऑस्ट्रियातील चुकीच्या पत्यावर पाठवल्याचे नंतर समोर आले. ३१ ऑक्टोबर २०२६: पुन्हा नवीन जमानती वारंट काढण्यात आले. २३ नोव्हेंबर २०२६: थेट गैर-जमानती वारंट जारी करण्यात आले. टायमिंगचा कळीचा मुद्दा: ध्रुव राठी हे सामान्यतः ऑस्ट्रियामध्ये राहतात. परंतु ऑक्टोबर महिन्यात ते भारतात आले होते आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी द्वारे आयोजित आंदोलनात सहभागी होणार होते. तक्रारदाराच्या वकिलांनीही कोर्टात राठी भारतात आल्याचे नमूद करत सुनावणी घाईने घेण्याची मागणी केली. ते भारतात आल्यावर दिल्ली पोलिसांनी त्यांना आंदोलनाच्या दिवशीच ताब्यात घेतले; ज्याला राठी यांनी माझे अपहरण असे संबोधले होते. पाठोपाठ त्यांच्या नागरिकत्वावर आणि पासपोर्टवर प्रश्न उपस्थित केले गेले आणि आता हे गैर-जमानती वारंट काढण्यात आले. त्यामुळेच, एका जुन्या केसची फाईल अचानक सरकारविरोधी आंदोलनाच्या काळातच कशी गरम झाली, असा थेट सवाल विचारला जात आहे. बिल्किस बानो प्रकरण: २२ वर्षांचा संघर्ष आणि न्यायालयाचे नवे निर्णय ध्रुव राठी यांनी स्वतःविरुद्ध झालेल्या या कारवाईनंतर ज्या केसचा दाखला देत प्रशासनाला घेरले, ते प्रकरण म्हणजे २००२ च्या गुजरात दंगलीतील बिल्किस बानो प्रकरण होय. भयानक पार्श्वभूमी: २००२ मध्ये अवघ्या २१ वर्षांच्या आणि ५ महिन्यांच्या गरोदर असलेल्या बिल्किस बानो यांच्यावर गोध्रा कांडानंतर झालेल्या दंगलीत जमावाने सामूहिक बलात्कार केला होता. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या ३ वर्षांच्या चिमुकलीसह कुटुंबातील अनेक सदस्यांची निघृण हत्या करण्यात आली होती. दीर्घ न्यायालयीन लढा: निष्पक्ष सुनावणीसाठी २००४ मध्ये सुप्रीम कोर्टाने हा खटला मुंबईत वर्ग केला. २००८ मध्ये मुंबईतील विशेष न्यायालयाने ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि २०१७ मध्ये मुंबई हायकोर्टानेही ही सजा कायम ठेवली. सूट आणि वादग्रस्त सुटका: १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्यदिनी गुजरात सरकारने या ११ दोषींची मुदतपूर्व सुटका केली. बाहेर आल्यावर या नराधमांचे हार घालून आणि मिठाई भरवून स्वागत करण्यात आले आणि भाजपच्या एका आमदाराने त्यांना संस्कारी असे प्रमाणपत्र दिले. सुप्रीम कोर्टाचा धक्का: बिल्किस बानो यांच्या याचिकेवर ८ जानेवारी २०२४ रोजी सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारचा तो सुटकेचा निर्णय रद्द ठरवला आणि सर्व ११ दोषींना पुन्हा तुरुंगात धाडले. ऑक्टोबर २०२६ मधील नवा वळण: मात्र, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांच्या खंडपीठाने बिपिन चंद्र जोशी आणि प्रदीपरमन लाल मोडीया या दोन दोषींची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करत त्यांना जामीन मंजूर केला. १७ वर्षांचा कारावास आणि अपंगत्व हे कारण त्यासाठी देण्यात आले. या जामिनाची माहिती बिल्किस बानो यांना किंवा त्यांच्या वकिलांना आधी देण्यातच आली नव्हती; वृत्तपत्रांतून ही बातमी समजताच त्या पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली आल्या असून त्यांनी कुटुंबियांसह गुजरात सोडल्याचे वृत्त समोर आले आहे. ध्रुव राठींचा थेट सवाल: न्यायाचा दुहेरी मापदंड का? याच विरोधाभासावर ध्रुव राठी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. राठी म्हणाले की, ज्या प्रकरणात गरोदर महिलेवर अत्याचार झाला आणि चिमुकलीची हत्या झाली, त्यातील सिद्धदोष गुन्हेगारांना कोर्टाकडून जामीन आणि सहानुभूती मिळते; परंतु जे लोक सरकार आणि सिस्टीमच्या धोरणांवर प्रश्न विचारतात, त्यांच्या विरोधात ८ वर्षे जुन्या फायली अचानक उघडून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होतो. हा केवळ एका युट्युबरचा संताप नसून आज देशातील सुजाण नागरिकांच्या मनात निर्माण झालेली शंका आहे. गंभीर गुन्ह्यांतील दोषींवर मेहेरबानी आणि राजकीय विरोधकांवर कायद्याचा बडगा, हा न्यायाचा कोणता पैलू आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विरोधाचा आवाज दाबण्याचे तंत्र? वाढता राजकीय वाद हा संपूर्ण प्रकार केवळ ध्रुव राठी पुरता मर्यादित राहिलेला नाही. गेल्या काही महिन्यांत सरकारविरोधात बोलणाऱ्या किंवा निवडणूक आयोगाला सवाल विचारणाऱ्यांवर सातत्याने दबाव आणला जात असल्याचे चित्र दिसते: कॉकरोच जनता पार्टीचे सह-संयोजक सौरव्ह दास यांना लंडनला जात असताना दिल्ली विमानतळावर रोखण्यात आले आणि त्यांचा पासपोर्ट फ्लॅग करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात याच पक्षाच्या अनेक नेत्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले. दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनाचे केंद्र असणारे जंतर-मंतर हे ठिकाणच आंदोलनांच्या यादीतून हटवण्यात आले. या सर्व घटना साखळीकडे पाहिल्यास, सरकार आपल्या कामाचा हिशोब देण्याऐवजी टीकाकारांना कायदेशीर कचाट्यात अडकवून गप्प बसवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा संशय बळावत चालला आहे. शेवट लोकशाहीत न्यायालयाच्या निर्णयांवर चर्चा करणे, सरकारला प्रश्न विचारणे आणि न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवणे हा संविधानाने कलम १९ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला दिलेला मूलभूत अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा जरूर आहेत; परंतु त्या मर्यादांचा आधार घेऊन विरोधकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे लोकशाहीच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. आज देशासमोर सर्वात मोठा प्रश्न हा उभा राहिला आहे की, भारतात न्यायाचा खरा निकष काय उरला आहे? गंभीर गुन्हेगारांना मिळणारी मुभा आणि राजकीय विरोधकांना मिळणारी नोटीस यातील अंतर जेव्हा धूसर होते, तेव्हा न्यायावरील विश्वास डळमळीत होतो. ध्रुव राठींवरील गैर-जमानती वारंट आणि बिल्किस बानो यांच्या न्यायाची झालेली परवड या दोन्ही घटना आज आपल्या लोकशाही व्यवस्थेला एका मोठ्या वळणावर आणून उभ्या करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 101 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शिव-पार्वती ते इस्रायल-गाझा: राहुल गांधींनी संघाचा सांस्कृतिक बुरखा कसा फाडला?