छतावरील पाण्याच्या टाकीच्या पाइपमधून तीन चोरट्यांचा प्रवेश; सीसीटीव्हीत चोरीची घटना कैद नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील लातूर फाटा परिसरात असलेल्या होंडा शोरूममध्ये अज्ञात तीन चोरट्यांनी प्रवेश करून रोख रकमेसह छोटी लोखंडी तिजोरी असा एकूण २ लाख २७ हजार ३३ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी शोरूमच्या छतावरील पाण्याच्या टाकीच्या पाइपच्या मार्गाने आत प्रवेश केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याने या चोरीची चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोरूमचे जनरल मॅनेजर विशाल भवनदास देशमुख (वय ४२) यांनी दिलेल्या जबाबानुसार, ते १० ऑगस्ट २०२६ पासून होंडा शोरूममध्ये जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. शोरूम सोमवार ते शनिवार सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सुरू असते, तर रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता शोरूम सुरू झाल्यानंतर जमा झालेल्या रकमेतून २ लाख ८७ हजार रुपये बँकेत जमा करण्यात आले होते. त्यानंतर दिवसभरात जमा झालेली १ लाख ९२ हजार ४१७ रुपयांची रक्कम शोरूममधील तिजोरीत ठेवण्यात आली. सायंकाळी ६.३० वाजता शोरूम बंद करून नियमितप्रमाणे कर्मचारी घरी गेले. २२ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने शोरूम बंद होते. मात्र, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता शोरूम उघडण्यात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. साफसफाईसाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्यांना कॅश काउंटरची काच फुटलेली आणि परिसरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ सुरक्षा रक्षक किशन कदम यांना याची माहिती दिली. सुरक्षा रक्षकाने जनरल मॅनेजरला फोन करून चोरीची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर कॅश काउंटरच्या टेबलाखाली ठेवलेली छोटी लोखंडी तिजोरी गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शोरूममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन अज्ञात व्यक्ती पाइपच्या साहाय्याने छतावरून खाली उतरून कॅश काउंटरच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. छतावरील पाण्याच्या टाकीच्या पाइपमधून चोरट्यांनी शोरूममध्ये प्रवेश केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. २ लाख २७ हजारांचा मुद्देमाल चोरीला चोरट्यांनी सुमारे १५ हजार रुपये किमतीची छोटी लोखंडी तिजोरी आणि त्यामध्ये ठेवलेली २ लाख १२ हजार ३३ रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. या रकमेत ५००, २००, १००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नोटांचा समावेश होता. या घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल परत मिळवावा आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शोरूम व्यवस्थापकांनी केली आहे. Kanthak Suryatal Post Views: 31 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation यूपीत सपा-काँग्रेस युतीचा ६०/४० फॉर्म्युला ठरला? दिल्लीतील बैठकीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! पोलिसांचा गुरुजी हरपला! अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना घडविणारे रमेश कांबळे काळाच्या पडद्याआड