रब्बी हंगाम 2026-27 साठी कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू कालव्याचे दरवाजे उघडणे-बंद करणे, अनधिकृत पाणी उपसा व पाणीवाटपात अडथळा आणण्यास मनाई नांदेड – रब्बी व उन्हाळी हंगाम 2026-27 मध्ये उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर उजवा कालव्याच्या कालवा वितरण प्रणालीद्वारे होणाऱ्या सिंचन व बिगर सिंचन पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरळीत आणि नियंत्रित पद्धतीने व्हावे, तसेच उपलब्ध पाण्याचे न्याय्य पद्धतीने वितरण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर उजव्या कालव्याचे रब्बी हंगाम 2026-27 मधील पहिले कालवा आवर्तन दि. 1 नोव्हेंबर 2026 पासून सुरू करण्यात आले आहे. या कालव्याद्वारे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, मुदखेड, उमरी, हदगाव व हिमायतनगर या तालुक्यांतील गावांना सिंचनाचा लाभ मिळतो. तसेच हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्यांनाही या कालव्याचा लाभ होतो. मात्र, सद्यस्थितीतील दुष्काळी परिस्थितीमुळे सिंचनाच्या पाण्याची मागणी वाढली असून, उपलब्ध पाण्याचे नियोजनबद्ध वितरण करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर कालव्यावरील काटनियामक (सी.आर.), एस्केप व इतर नियंत्रण संरचनांमध्ये अनधिकृत हस्तक्षेप करणे, कालव्याचे दरवाजे परस्पर उघडणे अथवा बंद करणे, कालव्यात अडथळे निर्माण करणे, अनधिकृत पाणी उपसा करणे, कालव्याचे नुकसान करणे तसेच पाणीवाटप करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश दि. 18 नोव्हेंबर 2026 रोजीपासून ते दि. 16 जानेवारी 2027 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक, नांदेड व संबंधित पोलीस विभागाने आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आदेशाची व्यापक प्रसिद्धी देण्याची जबाबदारी संबंधित विभागांना सोपविण्यात आली असून, सर्व संबंधितांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 18 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मंचावरून निघण्याचा प्रयत्न की ट्रम्प यांचा गुगली? क्वाड परिषदेतील त्या व्हिडिओचे सत्य! नांदेडमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भाग्यनगर पोलिसांकडून ४ आरोपींना अटक, ८.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त