चारा, पाणी व आरोग्य व्यवस्थापनावर मार्गदर्शन सगरोळी येथे पशुकल्याणासाठी पशुसंवर्धन विभाग व धर्मा डाँकी सँच्युअरीचा पुढाकार नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गाढवांसह इतर पशुधनाचे संरक्षण, आरोग्य व योग्य संगोपनाबाबत जनजागृती करण्यासाठी 3 नोव्हेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. धर्मा डाँकी सँच्युअरी, सगरोळी यांच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत चारा व पाणी व्यवस्थापन, संतुलित आहार, उष्णतेपासून संरक्षण आणि पशुकल्याण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, धर्मा डाँकी सँच्युअरीचे विश्वस्त डॉ. संजीव सगरोळीकर, डॉ. जयंत जकाते, अभिजित महाजन, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साईनाथ पवार, डॉ. विकास गड्डेवाड तसेच कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ डॉ. निहाल मुल्ला व भास्कर बुच्छलवार उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध हिरवा व वाळलेला चारा, पीक अवशेष आणि पूरक पशुआहाराचा शास्त्रीय पद्धतीने वापर करण्यासोबतच पशुधनाला पुरेसे स्वच्छ पाणी व आवश्यक खनिजे देण्याचे महत्त्व यावेळी स्पष्ट करण्यात आले. गाढवांच्या पचनसंस्थेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन संतुलित आहार देणे, क्षमतेपेक्षा अधिक कामाचा भार न देणे, योग्य विश्रांती, खुरांची निगा आणि पाठीवरील जखमांची काळजी घेण्याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पशुधनासाठी सावली व हवेशीर निवारा, उष्माघातापासून संरक्षण, नियमित पशुवैद्यकीय तपासणी, जंतनियंत्रण, आवश्यक लसीकरण आणि आजारी पशुधनावर वेळेत उपचार करण्याचे आवाहन करण्यात आले. पशुधनाला उपासमार, तहान, अतिश्रम व दुर्लक्षापासून संरक्षण देणे ही पशुपालकांची जबाबदारी असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. या कार्यशाळेत गाढवपालक, पशुपालक व शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे आरोग्य व कल्याण जपण्यासाठी चारा-पाणी व्यवस्थापन आणि संवेदनशील पशुपालनाला प्राधान्य देण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला. Kanthak Suryatal Post Views: 10 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पाण्याचा अपव्यय टाळा, काटेकोर नियोजन करा