नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून उमरी आणि नांदेड शहरातील वजिराबाद परिसरात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. उमरी येथे चालत्या वाहनातून व्हिस्की दारूचे चार बॉक्स, तर वजिराबाद येथील बाजारपेठेत महिलेच्या पर्समधील ३० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. या दोन्ही घटनांमध्ये एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. चालत्या वाहनातून दारूचे बॉक्स लंपास उमरी-मुदखेड बायपास रोडवरील तळेगाव फाटा, उमरी येथे २९ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना घडली. फिर्यादी राहुल ब्रह्मानंद खडसेख (वय ४८, रा. वसमत, ता. वसमत) हे एमएच-१२ केपी-३०६४ क्रमांकाच्या वाहनातून व्हिस्की दारूचे बॉक्स घेऊन जात असताना अज्ञात चोरट्याने चालत्या वाहनात चढून वाहनातील व्हिस्की दारूचे चार बॉक्स चोरून नेले. या बॉक्सची किंमत ४० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारपेठेत महिलेच्या पर्सवर चोरट्यांचा डल्ला दुसरी घटना नांदेड शहरातील वजिराबाद परिसरात जिल्हेवाड किराणा दुकानासमोर १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी शोभा भारत मेलवाड (वय ६१, रा. गोवर्धनघाट, नांदेड) या बाजारपेठेत खरेदी करीत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील पर्समधील ३० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. खरेदीच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने हात साफ केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांचा तपास अनुक्रमे उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कानगुलवार आणि वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार केंद्रे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 54 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मोटारसायकल घासल्याच्या कारणावरून तलवार व खंजीराने हल्ला; तरुण गंभीर जखमी