नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या वजिराबाद भागात महानगरपालिके तर्फे अनधिकृत जाहिरात होर्डीग्सवर धडक कार्यवाही करुन वासवी क्लब मिडटाऊन नांदेडचे अध्यक्ष हरीशचंद्र नगनाथराव दाभशेटवार व सचिव नारायण व्यंकटराव कन्नावार यांच्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने मनपा हद्दीमध्ये जाहिरात फलक लावण्यासाठी एकुण 118 ठिकाण निश्चित केले असुन क्षेत्रिय कार्यालय क्र. 04 वजिराबाद अंतर्गत एकुण 22 ठिकाणी तात्पुरते जाहीरात फलकांच्या फ्रेम लावण्यात आलेल्या आहेत व त्या फ्रेमची साईज सुध्दा निश्चित करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये महानगरपालिकेने निर्धारीत केलेले शुल्क भरुन नागरीकांना / स्वंयसेवी संस्थांना तात्पुरती जाहिरात लावता येते. परंतु शहरातील डॉ. लेन व वजिराबाद चौरस्ता या ठिकाणी वासवी क्लब मिडटाऊन मार्फत विनापरवानगी जाहिरात फलक लावण्यात आल्याचे दिनांक 17 मे 2024 रोजी निदर्शनास आल्याने महाराष्ट्र विरुपन प्रतिबंधक कायदा 1955 चे कलम चे उल्लंघन केल्यामुळे दाभशेटवार व कन्नावार यांच्या विरुध्द वजिराबाद पोलीस स्टेशन येथे महानगरपालिके तर्फे गुन्हा क्रमांक 226/2024 हा दि. 17 मे 2024 रोजी नोंदविण्यात आला आहे.
सदरील कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व उपआयुक्त स. अजितपालसिंघ संधु यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यालय अधिक्षक गौतम कवडे, हरदिपसिंघ सुखमनी व पुंडलिक मोरे यांनी पार पाडली आहे.
शहरातील नागरीकांनी व व्यापारी वर्गाने अनधिकृत जाहिरात फलक लावुन शहर विद्रुपीकरण न करता रितसर शुल्क भरुन महापालिकेने निर्धारीत केलेल्या जागेवरच जाहिरात फल्क लावण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.