नांदेड(प्रतिनिधी)-मौजे नागेली ता.मुदखेड शिवारात एका शेतात पिकवलेला गांजा हा अंमली पदार्थ स्थानिक गुन्हा शाखेने छापा टाकून पकडला आहे. सापडलेल्या गांजाची झाडे आणि गांजाचे पावडर असा 9 किलो 772 ग्रॅम अंमली पदार्थ पोलीसांनी जप्त केला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे यांना मौजे नागेली शिवारातील गांजा पकडण्याची सुचना केली. त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, नायब तहसीलदार विजयकुमार पाटे, स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे, बारडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष केदासे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, संजीव जिंकलवाड, किशन मुळे, देविदास चव्हाण, गंगाधर घुगे, शेख कलीम, बालाजी मुंडे आदींचे पथक पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सुचनेप्रमाणे मौजे नागेली ता.मुदखेड गट नंबर 70 मध्ये पोहचले. त्या ठिकाणी गांजाची लहान मोठी अशी एकूण 52 झाडे सापडली. सोबतच गांजाचे पावडर सापडले. या सर्व अंमली पदार्थाचे वजन 9 किलो 772 ग्रॅम आहे. या अंमली पदार्थाची एकूण किंमत 58 हजार 970 रुपये आहे. ही सर्व कार्यवाी 16 मे रोजी रात्री उशीरा झाली.
स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे यांच्या फिर्यादीवरून शेत मालक साहेबराव रकमाजी गव्हाणे (55) याच्याविरुध्द अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा कलम 20(अ)(ब) नुसार बारड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 35/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास बारडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष केदासे हे करीत आहेत.