पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड पोलीस दलात दीर्घकाळ निष्कलंक व प्रामाणिक सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्यासह चार पोलीस अंमलदारांचा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘मंथन हॉल’ येथे हा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक अशोक भिमराव गुडपे (पोलीस स्टेशन माळाकोळी), ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दिगांबर संभाजीराव जोंधळे (पोलीस मुख्यालय), चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिमराव सुगराव नरवाडे (पोलीस स्टेशन हदगाव), पोलीस हवालदार वामन किशन कांबळे (बक्कल क्रमांक २८०१) आणि पोलीस नाईक श्याम अर्जुनराव काळे (बक्कल क्रमांक २३२९) यांचा समावेश आहे. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांनी पोलीस दलात बजावलेल्या दीर्घकालीन सेवेचे कौतुक केले. कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडणे, गुन्हे प्रतिबंध व तपास तसेच वाहतूक नियमन यांसारख्या महत्त्वपूर्ण कर्तव्यांमध्ये त्यांच्या योगदानामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढण्यास मोलाची मदत झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी व सुखी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. समारंभादरम्यान सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव व्यक्त केले. पोलीस दलातील सेवा ही केवळ नोकरी नसून समाजाच्या सुरक्षिततेसाठी जबाबदारीने पार पाडलेले कर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सेवाकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल वरिष्ठ अधिकारी, सहकारी अधिकारी व अंमलदारांचे त्यांनी आभार मानले. या कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) सुनील माने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, पोलीस कल्याण विभाग, मारोती कांबळे व महिला अंमलदार सविता भिमलवाड यांनी केले. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीर्घ व उल्लेखनीय सेवेनंतर सहकाऱ्यांना निरोप देताना समारंभात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. Kanthak Suryatal Post Views: 331 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ३७ व्या नांदेड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा दिमाखदार समारोप; पोलीस मुख्यालय नांदेड संघाला सर्वसाधारण विजेतेपद रविवारी नांदेडमध्ये डॉ. विलासराज भद्रे यांना श्रद्धांजली सभा